दिवाळी खरेदी जोरात, बाजारपेठेने घेतली उसळी

प्रकाश बनकर
Tuesday, 10 November 2020

अवघ्या दोन-तीन दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या सणाच्या खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी दिसून येत आहे.

औरंगाबाद : अवघ्या दोन-तीन दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या सणाच्या खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी दिसून येत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे बंद असलेली बाजारपेठ दसऱ्यापासून पूर्वपदावर आली आहे. आता दिवाळीसाठी साहित्य खरेदीची लगबग सुरू आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बाजारपेठेने मोठी उसळी घेतल्याचे सध्याचे चित्र आहे. सोमवारी (ता.९) आकाशदिवे, पणत्या, लायटिंग, लक्ष्मीपूजनासाठी देवीच्या मूर्ती व साहित्यासह कपडे खरेदीसाठी दुकानात मोठी गर्दी दिसून आली.

औरंगाबादमध्ये ३९ हजार नागरिक आजारी, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेतून माहिती आली समोर

दिव्यांचा सण असल्यामुळे यासाठी लागणारे आकाश कंदिल खरेदीसाठी ग्राहक बाजारात आले होते. यंदा विविध प्रकारांतील कापड, प्लॉस्टिकचे आकाशदिवे जोरात विक्री होत आहेत. यंदा लायटिंग असलेल्या नव्याने आलेल्या आकाशदिव्यांना मोठी पसंती मिळत आहेत. १०० ते ७०० रुपयांपर्यंत याच्या किमती आहेत. तर थ्री डी पणतीलाही सर्वाधिक मागणी आहे. पारंपरिक पणती, बोळके खरेदी केली जात आहे. कोरोनामुळे पणती, आकाश दिव्यांच्या किंमतीत कुठलीच वाढ करण्यात आलेली नाही. यासह आकर्षक असे तोरण खरेदीलाही मोठी मागणी असल्याची माहीती विक्रेते गणेश चौधरी यांनी दिली.

कापड मार्केटमध्येही गर्दी
लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान भरुन काढण्याचा प्रयत्न व्यापारी, दुकानदार करीत आहेत. जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे वळविण्यासाठी कापडे व रेडिमेड विक्री करणाऱ्यांनी सवलती दिल्या आहेत. जवळपास २० ते ३० टक्के सुट जाहिर केल्यामुळे लोकही बंपर खरेदी करीत आहेत. नवरात्रोत्सवापासून कपडा मार्केटमध्ये रेलचेल दिसून आली. टिळकपथ, पैठणगेट या भागातील दुकानांत सोमवारी तोबा गर्दी झाली होती. कापड्याच्या किंमतीही स्थिर असल्याचे विक्रेत्यांना सांगितले.

 

 

या रविवारपासून दिवाळीच्या खरेदीला सुरुवात झाली. नोव्हेंबर महिन्याची पहिली तारीख असल्याने अनेकांच्या हातात वेतन पडले. त्यामुळे मार्केटमध्ये तेजी दिसली. आता गर्दी दिवसेंदिवस वाढणार असल्याने व्यवसायही चांगला होईल.
- हरविंदर सिंग सलुजा, व्यापारी

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali Shopping Go Up, Boom In Market Aurangabad News