डॉक्टरांचे घाटीत कामबंद आंदोलन, कोविड भत्त्यात वाढ करण्याची मागणी

माधव इतबारे
Tuesday, 13 October 2020

घाटी रुग्णालयातील आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांनी आज मंगळवारी (ता. १३) सकाळी दहा वाजेपासून एकदिवसीय लाक्षणिक कामबंद आंदोलन सुरू केले.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांनी आज मंगळवारी (ता. १३) सकाळी दहा वाजेपासून एकदिवसीय लाक्षणिक कामबंद आंदोलन सुरू केले. कोविडचे काम दिले ते करीत असताना मुंबईसह इतर ठिकाणच्या धर्तीवर कोविड भत्त्यात वाढ करावी अशी त्यांची मागणी आहे. लेखी आश्‍वासन न दिल्यास कोविड वॉर्डातील सेवा थांबविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

एक जूनपासून कोविड वॉर्डात सुमारे २०० आंतरवासिता डॉक्टर चक्रानुक्रमे (रोटेशननुसार) सेवा देत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी येथे स्थानिक प्रशासनाकडून आंतरवासिता डॉक्टरांना जादा मानधन मिळते. या धर्तीवर घाटीतील आंतरवासिता डॉक्टरांच्या कोविड भत्त्यात वाढ करावी, सध्या दहा हजार आठशे रुपये प्रतिमहिना या डॉक्टरांना मानधन मिळते ते ३० हजार करावे अशी त्यांची मागणी आहे.

अर्धे सत्र संपले तरी अकरावी प्रवेशाची प्रतीक्षा; विद्यार्थी, पालक अन् शिक्षकांची वाढली चिंता

या मागणीबाबत त्यांनी दीड महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे; परंतु जिल्हा प्रशासनाकडून हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी आज सकाळपासून कामबंद आंदोलन केले. यावेळी त्यांनी घोषणाबाजीही केली. दुपारी तीनपर्यंत हे आंदोलन सुरू होते. यादरम्यान घाटीत रुग्णसेवेवर काही परिणाम झाला नसला तरीही निवासी डॉक्टरांना आंतरवासिता डॉक्टरांचे काम करावे लागले.

जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक
आंतरवासिता डॉक्टरांच्या आंदोलनाची दखल घेत तीन वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. आदेश ठोंबरे, डॉ. वैभव गलगुंडे, डॉ. सोहम बरकुले, डॉ. श्रुती जाधव, डॉ. निलोफर शेख यांच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलाविले. यावेळी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता भारत सोनवणे, डॉ. दीक्षित हेही होते. सात दिवसांत राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, त्यांच्याकडून निधी न मिळाल्यास स्थानिक पातळीवर हालचाली करू असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याचे डॉ. आदेश ठोंबरे म्हणाले.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors Strike For Allowance Hiking In Ghati Aurangabad News