डीपी जळल्याने दहा गावातील पाणीपुरवठा बंद

नानासाहेब जंजाळ 
Friday, 11 December 2020

चार ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या दहा गावांना डीपी जळून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असूनही गेल्या आठ दिवसापासून घोटभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे

शेंदूरवादा (जि.औरंगाबाद) : शेंदूरवादा (ता.गंगापूर) परिसरातील सावखेडा, मांगेगाव, पांढरओहोळ तळपिंपरी चार ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या दहा गावांना डीपी जळून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असूनही गेल्या आठ दिवसापासून घोटभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

ग्रामपंचायत व महावितरणाच्या बेजबाबदार कारभारामुळे दहा गावातील ग्रामस्थांना वेठीस धरल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. डिपी जळून जवळपास दहा दिवस झाल्याने वीज  खंडीत असून त्यामुळे विहिरींना मोठ्या प्रमाणावर पाणी असतानाही महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून ग्रामस्थामध्ये महावितरण ग्रामपंचायत विषयी रोष निर्माण झाला आहे.

गळा चिरून तरुणाची हत्या; रक्ताने माखलेला मृतदेह पिंडीवर, औरंगाबाद जिल्ह्यातील खळबळजनक घटना

शेंदूरवादा परिसरातील सर्वच गावांमध्ये महावितरणकडून नेहमीच चालढकल भूमिका घेत कामांना टाळाटाळ केली जात आहे. डीपी जळल्यानंतर शेतकऱ्यांकडून वायरमन व संबंधिताचे वरकमाईकडे लक्ष असल्याने अशी सर्वाजनिक कामे करायची कोणी असा सवाल या ठिकाणी ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे. लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सरपंच ताराचंद दुबिले, संजयबापु  सुकासे, कारभारी दुबीले, राजेंद्र शेळके, सुनिल मुळे, संदीप सुकासे, दत्तु सूकासे, उपसरपंच राजेंद्र गावंडे, राबसाहेब सुकासे, सोमनाथ वल्ले आदींनी केली आहे.

शेंदूरवादा महावितरणचा कारभार डमी वायरमनच्या हाती 
शेंदुरवादा महावितरण कार्यालयांतर्गत जवळपास 32 गावांना वीज पुरवठा केला जात असून या ठिकाणी कार्यरत असलेल्या वायरमन कडून प्रत्येक गावांमध्ये आपापल्या सोयीने डमी वायरमन नेमण्यात आला असून गावामध्ये नवीन डीपी बसवणे नवीन कोटेशन देणे वसुली अशी विविध कामे आधिकचे पैसे घेऊन केले जात असल्याची चर्चा सुरू असून हा सर्व कारभार डमी वायरमन च्या हाती असल्याचे बोलले जात आहे.

औरंगाबादेत रावसाहेब दानवेंच्या विरोधात ‘प्रहार’चे पाण्याच्या टाकीवर आंदोलन सुरु

सदरील पाणीपुरवठ्याची डीपी दुरुस्तीसाठी आमचे पथक गाडीसह गेले असता ती डीपी जायकवाडी धरणाच्या पाण्यात बुडालेली असून  सद्या काढणे शक्य नसून पाणी कमी झाल्यानंतर तत्काळ दुरुस्त करण्यात येईल.
चंद्रकांत प्रधान (सहाय्यक अभियंता)

पाण्यासाठी भटकंती होत असलेली गावे
तळपिंप्री, नागापूर, औरंगापुर, हार्सुली, सावखेडा, मंगेगाव, पांढरओहळ, वझर, शंकरपुर, बोरुडी, 

पाणीपुरवठ्याची डीपी जलल्याने गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असून सदरील ग्रामपंचायत मार्फत डीपी काढून देण्यास आम्ही तयार असतानाही महावितरणचे अधिकारी व वायरमन यांच्या कडून टाळाटाळ करत वेळकाढूपणा चालू असल्याने ग्रामस्थांना नाहकचा त्रास सहन करावा लागत आहे.
ताराचंद दुबिले, सरपंच

 

(edited by- pramod sarawale) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dp burning shuts down ten villages water