
आपेगाव लगत असलेल्या गोपेवाडी या शिवारात पुन्हा सोमवारी (ता.२८) बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून माहिती मिळताच वन विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे.
पैठण (जि.औरंगाबाद) : आपेगाव लगत असलेल्या गोपेवाडी या शिवारात पुन्हा सोमवारी (ता.२८) बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून माहिती मिळताच वन विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. या भागात पिंजरे लावण्यात आले आहेत.
ज्या भागात बिबट्याने तीन शेतकऱ्यांवर हल्ला करून ठार केले. त्याच ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत.
काही दिवसआधी करमाळा येथे बिबट्या ठार केल्याची बातमी सगळीकडे पसरली होती. यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. परंतु आता पुन्हा बिबट्याची ही वार्ता समजल्याने व गोपेवाडी या गावातील खुद्द काही नागरिकांनी समक्ष बिबट्या दिसल्याचे सांगितले आहे. या बिबट्याने आपेगाव येथील शेती शिवारातील पितापुत्र शेतकऱ्यांना ठार केल्याची घटनेची आठवण झाली असून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
वनविभागाचे अपयश!
आपेगावसह या भागातील अनेक गावांत बिबट्याचा वावर असून दोन वर्षाच्या काळात बिबट्याने या भागातील अनेक शेत वस्तीवरील शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांचा फडशा ही पाडला आहे. तसेच तीन शेतकऱ्यांचा नाहक जीव पण घेतला आहे. अशा मोठ्या घटना येथे घडल्यानंतर वन विभागाने कॅमेरे, पिंजरे लावले तरी पण वनविभागाच्या यंत्रणेला यश आले नाही. त्यामुळे आता वन विभागाने अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
संपादन - गणेश पिटेकर