दिलासा : तब्बल साडेअकरा हजार नमुने कोरोना निगेटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

महापालिका, घाटी रुग्णालय, मिनी घाटी रुग्णालयाच्या माध्यमातून आतापर्यंत १३ हजार ४६१ जणांचे लाळेचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी ११ हजार ४१५ नमुने कोरोना निगेटिव्ह निघाल्याचे महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने एकीकडे चिंता व्यक्त केली जात असली तरी दुसरीकडे कोरोनाची चाचणी घेतल्यानंतर अहवाल निगेटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाणदेखील मोठे आहे. महापालिका, घाटी रुग्णालय, मिनी घाटी रुग्णालयाच्या माध्यमातून आतापर्यंत १३ हजार ४६१ जणांचे लाळेचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी ११ हजार ४१५ नमुने कोरोना निगेटिव्ह निघाल्याचे महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. ज्या भागात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत तिथे महापालिकेचे पथक जाऊन संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेत आहेत. त्यासोबतच घाटी रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व खासगी लॅबच्या माध्यमातून देखील लाळेचे नमुने घेतले जात आहेत. गेल्या अडीच महिन्यांच्या काळात या यंत्रणेच्या माध्यमातून १३ हजार ४६१ जणांचे लाळेचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी १,३६८ नमुने घाटी रुग्णालयाच्या माध्यमातून घेण्यात आले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

२,६३३ नमुने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून घेण्यात आले. महापालिकेच्या माध्यमातून ८,६३२ तर खासगी खासगी लॅबच्या माध्यमातून ८२८ जणांचे लाळेचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी ११ हजार ४१५ नमुने कोरोना निगेटिव्ह निघाले आहेत तर १९४६ नमुने कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. १०१ नमुन्यांचे अहवाल आलेले नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सात जूनच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 

१२२४ जण परतले घरी 
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा शंभरवर गेला असला तरी उपचार घेऊन कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. १९४६ रुग्णांपैकी १२२४ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत तर सध्या ६१९ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
 
नव्या भागात कोरोनाचा फैलाव सुरूच 
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २,०६५ वर गेली आहे. यातील १२२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान रोज नवीन वसाहतीमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी उस्मानपुरा भागातील पीरबाजार येथे आठ रुग्ण आढळून आले. मजनू हिल भागातही एक बाधित रुग्ण आढळला.

फाजलपुरा भागातील मोहनलालनगरात एक तर सिडको एन-९ भागातील संत ज्ञानेश्वरनगरात पाच रुग्ण आढळले. ज्युबलीपार्क भागात एक, सातारा परिसरात तीन रुग्ण आढळून आले. तीसगाव येथील पोलीस वसाहतीमध्ये एक रुग्ण आढळून आला. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व्हेक्षण, निर्जंतुकीकरण करून रस्ते सील करण्यात आले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven and a half thousand samples corona negative