esakal | लॉकडाउनमध्येही केंद्राने केले राजकारण...कोण म्हणतंय वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाउनमध्येही केंद्राने केले राजकारण...कोण म्हणतंय वाचा...

लॉकडाउनमध्ये आरोग्य आणि अन्नसुरक्षा अशी दोनच कामे असतानाही शासनाने योग्य जबाबदारी पार पाडली नाही. उलट लॉकडाउनच्या काळातही सरकारने राजकारण केले, असा आरोप हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस आणि स्वराज इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुभाष लोमटे यांनी केला. 

लॉकडाउनमध्येही केंद्राने केले राजकारण...कोण म्हणतंय वाचा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळीच लॉकडाउन न केल्याने कोरोनाचे रुग्ण पाचशेपटीने वाढले आहेत; तसेच अचानक लॉकडाउन केल्याने कष्टकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. लॉकडाउनमध्ये आरोग्य आणि अन्नसुरक्षा अशी दोनच कामे असतानाही शासनाने योग्य जबाबदारी पार पाडली नाही. उलट लॉकडाउनच्या काळातही सरकारने राजकारण केले, असा आरोप हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस आणि स्वराज इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुभाष लोमटे यांनी केला. या विरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ   

आधी नव्हते सरकारला गांभीर्य 
लॉकडाउनच्या अनुषंगाने कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर श्री. लोमटे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये शुक्रवारी संवाद साधला. कोरोनाचा देशामध्ये पहिला रुग्ण हा ३० जानेवारी रोजी केरळमध्ये आढळला, त्याचवेळी परदेशातून येणाऱ्यांना विलगीकरण केले असते, तर कोरोनावर नियंत्रण मिळवता आले असते. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दौरा, मध्यप्रदेश सरकार नाट्य यामध्ये सरकार मश्गूल होते. उलट १५ मार्च रोजी केंद्राने कोरोनाचा मोठा धोका नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे कोरोनाचे कुठलेही गांभीर्य केंद्र सरकारला नाही हेच स्पष्ट झाले आहे. देशात ८० टक्के कष्टकरी आहेत, त्यांच्या प्रश्नाबद्दल सरकार गंभीर नाही. लॉकडाउनच्या काळात वेतन सुरू ठेवावे असे परिपत्रक काढण्यात आले; मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही. मुळात लॉकडाउन करण्यास उशीर केला, आणखी आठ दिवस दिले असते तर लोकांना आपल्या घरी जाता आले असते; मात्र अचानक लॉकडाउन केल्याने कोट्यवधी लोक अडकून पडले. त्यामुळे त्यांना अन्न आणि घरापर्यंत सोडण्याची केंद्र व राज्य अशा दोन्ही सरकाराची जबाबदारी होती. 

Covid warriors : चिमुकलीला बाधा, पण कोरोनालाही घाबरलं नाही आईचं काळीज 

बेजबाबदार सरकार 
शासनाकडे संपूर्ण यंत्रणा असतानाही सरकारने जबाबदारी पार पाडली नाही. त्यामुळे रस्त्यावरून पायी चालणारे कोट्यवधी लोक दिसत होते. मुळात कष्टकरी वर्गाशी सरकारला देणेघेणे नाही हे उघड झाले. या काळात गरज असलेल्या प्रत्येकाला मोफत रेशन दिले पाहिजे, शेजारच्या तेलंगणा, तामिळनाडू, दिल्ली सरकारने जे केले ते महाराष्ट्रात का होत नाही? केंद्राच्या पॅकेजमध्ये काय ते उद्या मिळेल; मात्र गरिबांना आज मदतीची गरज आहे, त्यामुळे पॅकेजचा फायदा होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

श्री. लोमटे म्हणाले...

  • दिरंगाई झाल्यामुळेच वाढले पाचशेपट रुग्ण 
  • लॉकडाउन काळात प्रत्येकाला रेशन द्यावे 
  • अडकलेल्यांना घरापर्यंत सोडले पाहिजे 
  • मजुरांच्या खात्यावर रोख रक्कम टाकावी