मेहुणीच्या अल्पवयीन मुलीचे शोषण, काका, मामाला १० वर्षे सक्तमजुरी 

सुषेन जाधव
Saturday, 17 October 2020

शिक्षिकेमुळे उघडकीस आली घटना, शौचालयात झोपण्याची देत होते शिक्षा 

औरंगाबाद : मेहुणीच्या सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे तिच्या मावशीचा पती व नात्याने चुलतमामा असलेल्या दोघांनी लैंगिक शोषण केल्याप्रकरणात भादंवि व पोक्सो कायद्यान्वये दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी गुरुवारी (ता.१५) सुनावली. याप्रकरणात पीडितेच्या मावशीला तीन महिन्यांचा कारावास सुनावण्यात आला. ही घटना उघडकीस आणलेल्या शिक्षिकेसह इतर सहशिक्षिका व पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

या प्रकरणातील तिघेही संशयित आरोपी मुकुंदवाडीतील रहिवासी आहेत. सात सप्टेंबर २०१७ रोजी पीडिता शाळेत आल्यानंतर रडत असताना तिची शिक्षिकेने चौकशी केली असता घटना समोर आली. पीडिता, मला घरी जायचे नाही, शाळेतच राहायचे आहे, म्हणताच त्याबाबत अधिक जाणून घेतले. पीडितेने शिक्षिकेला दिलेल्या माहितीनुसार संबंधित मुलीला आई-वडील नाहीत. त्यामुळे ती मावशीकडे राहत होती. मावशीच्या घरात पीडितेला सर्व कामे करावी लागत असत.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

काम नाही केले तर घराबाहेर काढण्याची धमकी दिली जायची, तर रात्री शौचालयात झोपण्यास सांगितले जात असे. एके दिवशी शौचालयात झोपलेली असताना मावशीचा पती व चुलतमामा अशा दोघांनी मुलीला निर्वस्त्र करून लैंगिक शोषण केले. कोणाजवळ वाच्यता केली तर ठार मारण्याची धमकीही त्या दोघांनी दिली. मावशीला सांगितले तर काम जड झाले म्हणून खोटे आरोप करते आहेस, असे ऐकावे लागले. घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या शिक्षिकेने सहशिक्षिकेला घेऊन मुख्याध्यापक व स्थानिक नगरसेवकांच्या कानावर घटना टाकली. सर्वांच्या विचारानंतर शिक्षिकेने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अशी झाली शिक्षा 

तक्रारीवरून मुलीचा काका, मावशी आणि चुलतमामा यांच्याविरोधात भादंवि व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाच्या सुनावणीत सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात फिर्यादी शिक्षिका, सहशिक्षिका व पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपी काका व चुलतमामा यांना प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास व पोक्सो कायद्याच्या कलम ८ खाली प्रत्येकी चार वर्षे सश्रम कारावास तसेच भादंवि कलम ५०६ खाली दोघा आरोपींना एक वर्ष कारावास आणि भादंवि ५०६ खाली आरोपी मावशीला तीन महिन्यांचा कारावास ठोठावला. या प्रकरणात अॅड. अविनाश कोकाटे यांनी सरकार पक्षाला साहाय्य केले. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exploitation of minor girl Both accused were given ten years hard labor