लॉकडाऊन मध्ये वाहन कुठेही पंक्चर होऊ द्या, गुड्डूभाईला फोन करा : जागेवर मिळेल सेवा

अनिलकुमार जमधडे
गुरुवार, 16 जुलै 2020

-कोरोना योद्ध्यांना मिळतेय सेवा
-पंक्चरसाठी स्कूटरवर सेटअप

औरंगाबाद : शहरात सुरु असलेल्या कडक लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या दुचाकी चारचाकी वाहनांचे पंक्चर काढण्यासाठी शेख इम्रान ऊर्फ गुड्डू हा सध्या मदतीला धावत आहे. वाहन कुठेही पंक्चर झाले तरीही तो त्याने निर्माण केलेल्या खास व्यवस्थेमुळे जागेवर पोहचून वाहनाचे पंक्चर जोडून देतो. सध्या हा योद्धाही चांगलाच चर्चेत आहे. 

कोरोनाच्या अनुषंगाने शहरात कडक लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या काळात केवळ आरोग्य कर्मचारी, पोलीस यंत्रणा, पत्रकार आणि काही शासकीय कर्मचारी ड्यूटीवर आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना जाण्या-येण्यासाठी दुचाकी अथवा चारचाकीची गरज पडते. सध्या काही मोजकेच पेट्रोल पंप उघडे आहेत, त्यामुळे त्यांना पेट्रोल मिळते. मात्र पंक्चरची दुकाने बंद असल्याने वाहन पंक्चर झाल्यास अथवा वाहनाची हवा गेल्यास काहीही पर्याय नाही.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

गुड्डूभाई मदतीसाठी

सध्या एकही पंक्चरचे दुकान उघडे सापडू शकत नाही, कारण प्रशासनाने पंक्चरचे दुकान किंवा गॅरेजला सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली नाही. या निर्णयामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीही पंचायत झालेली आहे. अशा बिकट परिस्थितीत बीड बायपास भागातील शेख इम्रान ऊर्फ गुड्डू हे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. त्यांनी आपल्या स्वतःच्या स्कूटरवर टायरमध्ये हवा भरण्यासाठी लागणारा कॉम्प्रेसर बसवून घेतला आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दिवसभर सेवा

दररोज सकाळी कॉम्प्रेसर मध्ये हवा फुल करून घेतल्यानंतर दिवसभर गरजेनुसार हे गृहस्थ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहनांचे पंक्चर काढण्याचे किंवा हवा भरून देण्याचे काम करत आहेत. कुठूनही फोन आला तर अवघ्या दहा मिनिटात पंक्चर झालेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात आणि वाहनाचे पंक्चर काढून देतात. यातून थोडाफार उपजीविकेचा प्रश्न सुटतो, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवा मिळते ही मोठी बाब आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

फोन नंबर बहुतांश पोलिसांकडे

शेख इम्रान यांचे फोन नंबर बहुतांश पोलिसांकडे आहेत त्यामुळे पोलिसांचे वाहन कुठेही पंक्चर झाले तर शेख इम्रान यांना बोलावून घेतले जाते काही वेळातच शेख इम्रान हे दुचाकी असो अथवा चारचाकी पंक्चर काढून संबंधित कर्मचाऱ्याची अडचण दूर करतात. यामुळे ड्युटी वर निघालेल्या आणि ऐनवेळी वाहन पंक्चर झालेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळतो आहे. लॉकडाऊन पासून शेख इम्रान ही घरपोच पंक्चर काढुन देण्याची  सेवा देत आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी कोणाचेही वाहन पंक्चर झाल्यास मोबाईल (क्र. ९२२५१४७७७५) यावर आपल्याला फोन करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facilitate on-site puncture of vehicle