शेतकऱ्याने फिरविला सर्वच पिकांवर नांगर! 

यादव शिंदे
Wednesday, 18 November 2020

नुकसानीतून वगळल्याची नाराजी अन् बोंडअळीने त्रस्त 

जरंडी (औरंगाबाद) : अतिवृष्टीच्या नुकसानीतून वगळले आणि त्यातच कपाशी पिकांवर झालेला बोंडअळींचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्याने चक्क शेतातील सर्वच पिकांवर नांगर फिरविला! बुधवारी दिवसभर शेतातच नांगारावर बसून शासनाच्या भूमिकेविरुद्ध आंदोलन केल्याचा प्रकार घोसला (ता.सोयगाव) येथे बुधवारी घडला. नांगरावर बसून संपूर्ण शेती नांगरून पूर्ण झाल्याशिवाय हा शेतकरी नांगरावरून खाली उतरला नाही. अखेरीस परिसरातील शेतकऱ्यांनी सदर शेतकऱ्याची समजूत घालून सायंकाळी उशिरा या शेतकऱ्याचा नांगर ठिय्या आटोपता घेतला. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सोयगाव आणि जरंडी या दोन मंडळांना अतिवृष्टीच्या नुकसानीतून मिळालेला ठेंगा आणि त्यातच कपाशी आणि मक्यावर झालेल्या अळींचा वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. घोसला येथील शेतकरी बालाजी प्रकाश वाणी यांनी अख्ख्या शेतावर नांगर फिरवून शासनाचा नांगरावर बसून दिवसभर निषेध केला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या शेतकऱ्याने चक्क शेतातील सर्वच पिकांवर नांगर फिरविला. शासनाच्या व नुकसानीच्या कचाट्यातून मुक्त झाला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अतिवृष्टी मध्ये सोयगाव मंडळात झालेले नुकसानीला शासनाने ३३ टक्क्यांच्या आत नुकसानीचा निकष लावून नुकसानीच्या मदतीला तिलांजली दिली. त्यातच कपाशी पिकांवर दुसऱ्याच वेचण्यामध्ये बोंडअळींचा प्रादुर्भाव आढळून आला. रब्बीच्या मक्यावरही लष्करी अळींचा प्रादुर्भाव आढळून आल्याने या शेतकऱ्याने अख्खे शेतच पिकांसह नांगरून काढले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नांगरावर ठिय्या आंदोलन
संतप्त शेतकरी बालाजी वाणी यांनी थेट शासनाच्या भुमिकेविरुद्ध नांगरावर बसून बुधवारी शेतात उन्हातच ठिय्या आंदोलन केले. परिसरातील शेतकऱ्याच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी या शेतकऱ्याला समजूत काढून अखेरीस त्याने सायंकाळी उशिरा हे आंदोलन माघारी घेतले. 

शेतकऱ्यांला कोणी किंमतच देत नाही 
शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो. मात्र, त्याचा कोणीच विचार करीत नाही. विशेष म्हणजे निसर्गाचा कायम कोप आणि राजकीय धोरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याने जगायचे कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  

(Edited By Pratap Awachar)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer turn plow on all crops Jarandi news