माणुसकी हरवली : गर्भवती महिलेला काढले गावाबाहेर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

कोरोनाच्या भीतीने नाचनवेल येथील प्रकार 

औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील अन्वा (ता. भोकरदन) येथील एका बाधितेवर सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. एका सोनोग्राफी सेंटरमध्ये तिची सोनोग्राफीही करण्यात आली होती. त्यानंतर ती बाधित असल्याचे कळाले. दरम्यान, संबंधित सोनोग्राफी सेंटर आणि रुग्णालयामध्ये आलेल्या गर्भवती महिलांच्या नावांची यादी व्हॉट्सॲपवर व्हायरल झाली. त्यात नाचनवेल येथील एका गर्भवती महिलेच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे तिच्यासह कुटुंबीयांना ग्रामस्थांनी गावाबाहेर काढले आहे. आता भरउन्हाळ्यात या महिलेवर शेतात राहण्याची वेळ आली आहे. 

अन्वा (ता. भोकरदन) येथील एक महिलेस कोरोनाची लागण झाली. ही महिला सिल्लोड येथील एका रुग्णालयात सोनोग्राफीसाठी आली होती. सिल्लोड येथील दवाखान्यात १२ व १३ मे रोजी सिल्लोड तसेच कन्नड तालुक्यातील विविध गावांतून रुग्णतपासणीसाठी व सोनोग्राफीसाठी आले होते. या दोन दिवसांत रुग्णालयात आलेल्या रुग्णांच्या नावांची यादी व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाली.

यामुळे सोनोग्राफी सेंटर आणि दवाखान्यात कोण-कोण गेले होते हे उघड झाले. परिणामी, बाधित महिलेच्या थेट संपर्कात न आलेल्यांनाही ग्रामस्थांकडून त्रास देणे सुरू आहे. नाचनवेल येथील गर्भवती महिलाही तपासणीसाठी सिल्लोडच्या त्या रुग्णालयात आली होती. मात्र, ती महिला ज्या दिवशी त्या रुग्णालयात आली त्या दिवशी ही महिला रुग्णालयात आली नव्हती. याची माहिती त्या महिलेच्या कुटुंबीयांनी ग्रामस्थांना दिली. पण, व्हायरल झालेल्या यादीत त्या महिलेचे नाव असल्याने ग्रामस्थांनी तिच्यासह तिच्या कुटुंबीयांना गावाबाहेर काढले. आता दोन दिवसांपासून हे कुटुंब शेतात राहत आहे. 

असे ओळखा नैसर्गिकरीत्या आणि कृत्रिमरीत्या पिकलेले आंबे
 
क्वारंटाइनचे शिक्के नाहीत 
अन्वा येथील महिलेच्या संपर्कात आलेल्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचे कुठलेही शिक्के मारण्यात आले नसल्याची माहिती सिल्लोड येथील त्या दवाखान्यात उपचारासाठी गेलेल्या व संपर्कात न आलेल्या महिलेने दिली. आरोग्य विभागाची यंत्रणा व प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याने हा प्रकार घडत असल्याची माहिती समोर येत आहे. 

धक्कादायक : औरंगाबादेत एकाच वाड्यात तब्बल ६७ कोरोनाबाधित
  
यादी व्हायरल करणा‍ऱ्यांवर कारवाई होणार का? 
कोरोनाबाधित रुग्ण तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या संशयितांची नावे गुपित ठेवण्यात येतात. मात्र, सिल्लोड येथील त्या हॉस्पिटलच्या नावासह त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांच्या नावांची यादी व्हॉट्सअॅपवर व्हायरल करणाऱ्याविरुद्ध प्रशासन आता कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 
 
 

त्या महिलेसह तिच्या कुटुंबीयांनी सिल्लोड येथील त्या दवाखान्यात जाऊन आल्याचे सांगितले. त्यानुसार ग्रामपंचायत सदस्य, डॉक्टर्स यांची बैठक झाली. त्या महिलेला आणि त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही गावाबाहेर राहण्याचे सांगितले नाही. ते स्वतःहूनच शेतात राहत आहेत. 
- छायाबाई थोरात, सरपंच, नाचनवेल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear of Corona at Nachanvel