चोरट्यांशी झटापट, पितापुत्र जखमी; एका चोराला अखेर पकडलेच!

रामराव भराड
Friday, 20 November 2020

वाळूज परिसरात पहाटे थरार : एकाला पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात 

वाळूज (औरंगाबाद) : हॉटेल कोमल बारसह दोन मेडीकल स्टोअर असे चार शटर उचकटून चोरट्यांनी जवळपास सत्तर ते पंचाहत्तर हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. यावेळी झालेल्या झटापटीत चोरट्यांनी चाकू हल्ला केला. त्यात एका चोरासह हॉटेल मालक मिळून तीन जण जखमी झाले. यात एकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही थरारक घटना गुरुवारी (ता.१९) पहाटे २.३० ते ३.३० च्या सुमारास वाळूज येथे घडली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

वाळूज येथील लांझी रोडवर जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती मनोज जैस्वाल यांचे हॉटेल कोमल परमिटरुम व बियर बार आहे. बुधवारी रात्री ११ च्या सुमारास हॉटेल व्यवस्थापक वाल्मिक वाघ हे हॉटेल बंद करून घरी गेले होते. तर चार नोकर हॉटेलवरच्या मजल्यावर जेवण करून झोपले होते. गुरुवारी (ता.१९) पहाटे दोन चोरट्यांनी हॉटेलचे शटर उचकटून आत प्रवेश केला. ते हॉटेलसमोर असलेल्या कल्याण आरगडे यांनी पाहिले. त्यांनी लगेच मालक मनोज जैस्वाल यांना फोन करून कळवले. जैस्वाल हे लगेच हॉटेलकडे धावले. मुलगा पियुषही सोबतच आला. हॉटेल जवळ येताच त्यांना दोन चोरटे दुचाकी (एम एच २१ एफएम- ६२५०) वर बसून पळून जाण्याच्या प्रयत्नात दिसले. मनोज जैस्वाल यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मात्र, दुचाकी चालू करून चोरटे पसार होत असतानाच जैस्वाल यांनी दुचाकीला लाथ मारुन खाली पडले. एकाला पकडताच दुसरा चोर रोख रक्कम, विदेशी दारूच्या बाटल्या व सिगारेट असा अंदाजे सत्तर ते पंचाहत्तर हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळाला. दरम्यान पकडलेल्या एका चोरट्याशी मनोज जैस्वाल व पियुष जैस्वाल यांची चांगलीच झटपट झाली. यावेळी चोरट्याने केलेल्या चाकु हल्ल्यात जैस्वाल पिता-पुत्र स्वतः चोर असे तीन जण जखमी झाले. तरीही त्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात जैस्वाल यांना यश आले. घटनास्थळवरुन एक दुचाकी, एक चाकू व काही रक्कम पोलिसांनी जप्त केली. दरम्यान या थरारक घटनेपुर्वी याच चोरट्यांनी शेजारीच असलेले प्रशांत भवार यांच्या मेडीकलचे दोन शटर उचकटून दिड ते दोन हजार रुपये चिल्लर, चार ते पाच हजार रुपयाचे कॉस्मेटिक साहित्य, बॅग, व किमती स्प्रे त्याच प्रमाणे शिवप्रसाद चनघटे यांचे शिवा मेडिकल स्टोअर्सचे शटर उचकटून एक हजार आठशेची चिल्लर चोरली. घटनेची माहिती मिळताच वाळूज ठाण्याचे पोलीस काँस्टेबल पांडुरंग शेळके, राजू डाखुरे यांनी ठसे तज्ञ व स्वान पथकासह तात्काळ धाव घेत माहिती घेतली. दरम्यान, जखमी झालेल्या जैस्वाल पितापुत्राला प्रथम घाटीत व नंतर खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

व्यापाऱ्यांत खळबळ, वाळूज बंदची हाक 
वाळूज गावात मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाचा निषेध म्हणून शुक्रवारी वाळुज बंद करण्याची हाक तंटामुक्त गाव समिती वाळूज, शेतकरी संघटना, सर्वपक्षीय समिती व वाळुज व्यापारी असोसिएशन तर्फे देण्यात आली आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fight with thieves father and son injured finally caught thief