डॉक्टरवर गुन्हा : कोरोना रुग्णाच्या मृत्यूची अफवा पसरवली

Aurangabad news
Aurangabad news
Updated on

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांमध्ये असंख्य पोस्ट व्हायरल होत आहेत. या पोस्टमुळे खरी माहिती कोणती हे सांगणे कठीण झाले आहे. त्यातच औरंगाबादेत कोरोनावर उपचार घेणारी रुग्ण महिला दगावल्याबाबत खोटी व चुकीची माहिती सोशल मीडियात पसरविण्यात आली होती.

पोलिसांनी सजगतेने तपास केल्यानंतर एकाने प्लॅटिना व्हाॅट्सअप ग्रुपवर, तर चक्क एका डॉक्टरनेच आरोग्यम् डॉक्टर असोसिएशन या व्हाॅट्सअप ग्रुपवर पोस्ट केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी डॉक्टरसह दोघांवर बुधवारी (ता. १८) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार डॉ. व्यंकटेश भाऊसाहेब उबाळे (रा. खोकडपुरा) व महेश देशपांडे अशी संशयितांची नावे आहेत. १७ मार्चला एक पोस्ट व्हाॅट्सअपवर व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये औरंगाबाद कोरोनाबाबत उपचार घेत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला, अशी खोटी अफवा पसरविण्यात आली होती. 

१७ मार्चला बाराच्या सुमारास डॉ. व्यंकटेश उबाळे यांनी आरोग्यम् डॉक्टर असोसिएशन या व्हाॅट्सअप ग्रुपवर कोरोनावर उपचार घेत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला, अशी खोटी माहितीची पोस्ट केली होती. याबाबतची माहिती रुग्ण उपचार घेत असलेल्या रुग्णालयाच्या प्रशासनाला समजली. त्यांनी या ग्रुपच्या ऍडमिन असलेल्या एका डॉक्टरला संपर्क करून या पोस्टमधील माहिती खोटी असल्याचे सांगितले. तसेच ती पोस्ट करणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती विचारली. 

ती पोस्ट डॉ. व्यंकटेश उबाळे यांनी केली असे सांगितले. डॉ. व्यंकटेश यांना विचारणा केली असता त्यांनी महेश देशपांडे या व्यक्तीने प्लॅटिना व्हाॅट्सअप ग्रुपवर पोस्ट केली होती, असे उबाळे यांनी सांगितले. रुग्ण महिलेबाबत खोटी अफवा पसरविल्या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली. 

आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा 

तक्रारीनुसार पोस्ट करणाऱ्या संशयित दोघांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा साथरोग प्रतिबंध कायदा कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी १२ मार्चला जाहीर केलेल्या आदेशाचे उल्लंघन व खोटी अफवा पसरवली म्हणून गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अशी माहिती पोलीस  पोलीस उपायुक्त राहुल खाडे, निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.

यूजर्सवर कडक कारवाई होणार 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांमध्ये असंख्य पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यातच जाणीवपूर्वक काहीजण मात्र कोरोनाशी संबंधित खोटी व चुकीची माहिती लोकांपर्यंत व्हाॅट्सअप, फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांद्वारे पसरवित आहेत. समाज माध्यमाद्वारे अशा खोट्या व लोकांमध्ये गैरसमज, अफवा पसरतील अशा पोस्ट टाकण्यात येत असतील तर अशा यूजर्सवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिला.

औरंगाबाद शहरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहे. या महिला रुग्णाची प्रकृती व्यवस्थित असून रुग्ण दगावल्याबाबत खोटी व चुकीची माहिती सोशल मीडियात पसरविण्यात आली. याबाबत गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. 
- चिरंजीव प्रसाद, पोलिस आयुक्त. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com