अंतर पाच किलोमीटर... उकळले दीड हजार रुपये! 

अनिलकुमार जमधडे
Monday, 13 July 2020

- कडकडीत संचारबंदीत रुग्णांना मिळेनात वाहने 
- रुग्णांची दमछाक, खासगी रुग्णवाहिकेकडून लूट 

 
औरंगाबाद : कडकडीत लॉकडाउन आणि कायम व्यस्त असलेली शासकीय १०८ रुग्णसेवा यामुळे रुग्णांना वाहने मिळणे अवघड झाले आहे. या परिस्थितीचा फायदा घेत खासगी रुग्णवाहिका चालकांनी अक्षरशः लूट सुरू केली आहे. त्यामुळेच प्रशासनाने तत्काळ निर्णय घेऊन रुग्णसेवेसाठी मोफत रिक्षा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. 
शहरात कडकडीत संचारबंदीचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनातर्फे प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला आहे. यात रुग्णांच्या वाहनांची कुठलीही सोय प्रशासनाने केली नाही. त्यामुळे रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

एक प्रसंग 

रमानगर येथील पंचशिलाबाई हिवराळे यांना शनिवारी (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांचा मुलगा योगेशने आईला तातडीने दुचाकीवरून कसेबसे सेव्हनहिलजवळील खासगी रुग्णालयात आणले. या ठिकाणी काही तपासण्या करून त्यांना एक लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. ही रक्कम भरणे शक्य नसल्याने योगेशने आईला घाटी रुग्णालयात नेण्याचा विचार केला. रुग्णालयाने तासाभरात केलेल्या उपचाराचा खर्च भरून आईला घाटी रुग्णालयात नेण्याचे ठरवले. मात्र, आईला घाटीपर्यंत नेणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला. रस्त्यावर एकही वाहन नव्हते. त्यामुळेच त्यांनी शासनाच्या १०८ या रुग्णसेवेला फोन लावला. मात्र अनेक प्रयत्न करूनही फोन लागत नव्हता. त्यामुळे त्रस्त झालेल्या योगेशने ही माहिती बहिणीला दिली. बहिणीनेही १०८ ला फोन लावला. फोन लागला मात्र पेशंटजवळ कोण आहे, त्यांनीच फोन करावा, असा आग्रह १०८ हेल्पलाइनवरील कर्मचाऱ्याने केला. योगेश एकटाच असल्याने हतबल झाला होता. अखेर रुग्णालयाजवळचा चालक जवळ आला. त्याने सेव्हन हिल ते घाटी रुग्णालय जाण्यासाठी तब्बल दीड हजार रुपये घेतले! असाच अनुभव अत्यावश्यक सेवेची गरज असलेल्या अनेक रुग्णांना येत आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जिन्सी पोलिस कौतुकास पात्र 

रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णांची अडचण लक्षात घेऊन जिन्सी पोलिसांनी त्यांच्या हद्दीत रिक्षा सेवा उपलब्ध करून दिली आहे. जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी दहा रिक्षांना रीतसर परवानगी दिली आहे. या रिक्षा दिवसा आणि रात्री प्रत्येकी पाच याप्रमाणे चालविण्यात येत आहेत. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

प्रशासनाचाही हवा पुढाकार 

जिन्सी पोलिसांनी स्वतःच्या अधिकारात रुग्णांचा विचार करून रिक्षा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, प्रशासनाने रुग्ण रुग्णालयापर्यंत कसे जातील याचा साधा विचारही केला नाही. त्यामुळे लॉकडाउन आणखी पाच दिवस असल्याने तातडीने प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत रुग्णांसाठी रिक्षा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud by ambulance driver