संबोधी अकादमीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत भोजन 

संदीप लांडगे
शनिवार, 4 एप्रिल 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यामुळे शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना दिली मायेची ऊब

औरंगाबाद ः लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर संबोधी अकादमी संचलित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रामार्फत शहरात एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या सुमारे दीडशे विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत शहरात अडकलेल्या या विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय उशिरा घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना आपापल्या गावी जाणे शक्य झाले नाही. परिणामी, एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे दीडशे विद्यार्थी शहरातच अडकून पडले. 

वाचा कसा -  दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीत हलगर्जीपणा  

या दीडशेपैकी ७० टक्के मुली, तर ३० टक्के मुले आहेत. शहरातील लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या मेस, हॉटेल्स बंद झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपासमार होऊ लागली. अनेक विद्यार्थी चहा, बिस्किटावर दिवस काढत होते. ही बाब संबोधी अकादमीचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे यांना माहिती झाली. त्यांनी तातडीने या मुलांची यादी मिळवून व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला. तसेच या सर्व विद्यार्थ्यांना आधार देत सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली. 

हे ही वाचा...   अडगळीच्या वर्गखोलीत सापडली  रसायनशास्त्राची प्रश्‍नपत्रिका!  

यासाठी पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे, राजेंद्र साबळे पाटील, डॉ. किशोर उढाण, धवल क्रांती सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक हवेळीकर, सागर जाधव, प्रवीणकुमार खंडागळे, नागेश रणवीर, प्रीतमकुमार पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली भोजन पुरवणे सुरू आहे. यासाठी सागर पगारे, कमलेश नरवाडे, अमोलिक दांडगे, शैलेश वाव्हळे, सुदर्शन कावळे, पूजा सदाशिवे आदींनी पुढाकार घेतला आहे. 

हे ही वाचा -  शाळांच्या अनुदानाची वाट मोकळी  

लॉकडाऊनमुळे शहरात विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश, नाशिक अशा विविध ठिकाणचे एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी अडकले आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था लॉकडाऊनची परिस्थिती संपेपर्यंत संबोधी अकादमीतर्फे करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थी पुन्हा तणावमुक्तपणे परीक्षेची तयारी करू लागले आहेत. 
-समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे, संबोधी अकादमी 

Free meal arrangements for students trapped in the city due to coronavirus


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free meal arrangements for students trapped in the city due to coronavirus