१५२ कोटीतून किती रस्ते होणार वाचा...

Aurangabad amc news
Aurangabad amc news

औरंगाबाद- शहरातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता. १९) १५२.२४ कोटी रुपयांच्या निधी मंजूर केला आहे. या निधीतून २० रस्त्यांची कामे केली जाणार असून, महापालिका यातील आठ तर रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) प्रत्येकी सहा कामे करणार आहे. कामे वेळेत व दर्जेदार व्हावेत यासाठी विभागणी करण्यात आली असल्याचे महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. 

शहरातील रस्त्यांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२५ कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला होता. यातील पहिल्या टप्प्याच्या २५ कोटीतून सहा रस्त्यांची कामे करण्यात आली. त्यानंतर मिळालेल्या १०० कोटीतून सध्या ३० रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यांनी आणखी १२५ कोटींचा निधी देण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीपूर्वीच केली होती. मात्र नेहमीप्रमाणे महापालिकेला यादी अंतिम करण्यासाठी विलंब झाला. दरम्यान २६३ कोटी रुपायांची यादी राज्य शासनाला पाठविण्यात आली होती. त्यातील पहिल्या टप्प्याचा निधी बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा करून १५२.२४ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली.

रस्त्याची कामे दर्जेदार व्हावीत व सर्व कामे एकाचवेळी सुरू करून कमीत कमी कालावधीत पूर्ण व्हावीत म्हणून, महापालिका, राज्य रस्ते विकास महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या तिन्ही विभागांना कामे देण्यात आली आहेत. तिन्ही विभागांना प्रत्येकी ५० कोटींची कामे पूर्ण करावीत तसेच एकूण १५२ कोटी रकमेची नगर विकास विभागाच्या शहरी रस्ते विकास निधीतून प्रतिपूर्ती केली जाईल असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. एकूण २० रस्त्याची २२ किलोमीटरची कामे केली जाणार आहेत. प्रत्येकी सहा रस्त्याचे काम एमआयडीसी व एमएसआरडीसीतर्फे केले जाणार आहे. उर्वरित आठ रस्त्यांची कामे महापालिका करणार आहे. यावेळी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, एमएसआरडीसीचे एमडी राधेश्याम मोपलवार, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांची उपस्थिती होती. 

तीन दिवसात निघणार निविदा 
रस्ते तीन विभागामार्फत केली जाणार असले तरी निविदा मात्र महापालिकेमार्फतच काढल्या जाणार आहेत. येत्या तीन दिवसात या निविदा निघतील, महापालिकेने शासनाला पाठविलेल्या यादीत १०३ रस्त्यांचा समावेश होता. यातील नेमके कोणत्या रस्त्यांची कामे हाती घ्यायची, याचा निर्णय औरंगाबादमध्ये आल्यानंतर घेऊ, असेही आयुक्तांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com