Video : बच्चनस्टाईल डान्स करत आमदार बंब यांची धूम

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

आमदार कन्येचा विवाह म्हटला की, कोट्यावधींची उधळण, ऑर्केस्ट्रा, डीजे, खाद्यपदार्थांची रेचलेच, पाहुण्याचा बडेजाव आणि पंचक्रोशीत या विवाह सोहळ्याची चर्चा ओघाने आलीच.

औरंगाबाद : गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब हे त्यांच्या आक्रमक प्रतिमेसाठी प्रसिद्धच आहेत पण नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे त्यांची नवी छबी पाहायला मिळाली आहे. बंब यांच्या बच्चन स्टाईल डान्सचीच चर्चा सर्वत्र सुरू आहेत.

मुलीच्या लग्नात त्यांनी ''छोरा गंगा किनारे वाला, खुल जाय बंद अकल का ताला...'' या डॉन चित्रपटातील सुपरहिट गाण्यावर खास अमिताभ बच्चन स्टाईलने डान्स केला. 

आमदार प्रशांत बंब म्हणजे सडपातळ देहयष्टी, पण तितकाच कणखर आणि आक्रमक बाणा. गंगापुर-खुल्ताबाद विधानसभा मतदारसंघात त्यांच्या या स्वभावाचा अनुभव अनेकांना आला आहे. अगदी विधानसभेत मतदारसंघ असो की राज्यस्तरावरचा एखादा प्रश्‍न. अभ्यासपुर्ण आणि आक्रमकपणे आपली बाजू मांडत सगळ्यांना प्रभावित करण्यात बंब यशस्वी झालेले आहेत.

अशा राजकारणात विरोधकांना नामोहरम करणाऱ्या प्रशांत बंब यांचे हटके रुप नुकतेच लोकांना पहायला मिळाले. बंब यांच्या मोठ्या मुलीचा विवाह नुकताच त्यांच्या लासूर या राहत्या गावी पार पडला. आमदार कन्येचा विवाह म्हटला की, कोट्यावधींची उधळण, ऑर्केस्ट्रा, डीजे, खाद्यपदार्थांची रेचलेच, पाहुण्याचा बडेजाव आणि पंचक्रोशीत या विवाह सोहळ्याची चर्चा ओघाने आलीच.

हेही वाचा -

इब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबादेत, मूळ गाव कोणते? 

पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? जाणून घ्या... 

या ठिकाणी आहे थोरले बाजीरावांची समाधी, झाली दुरवस्था, पाहा PHotos

पण बंब यांनी या बाबतीतही सर्वाना आश्‍चर्याचा धक्का दिला. आपल्या कन्येचा विवाह त्यांनी अगदी साध्या पध्दतीने आणि साखरपुड्यातच केला. लग्न समारंभावर होणारा कोट्यावधींचा खर्च टाळून तो पैसा समाजोपयोगी कामात खर्च करण्याचा बंब यांचा मानस.

साधा विवाह सोहळा​

तर असा हा साधा विवाह सोहळा गेल्या आठवड्यात मोजक्‍या निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याची जितकी चर्चा साधेपणामुळे झाली तितकीच चर्चा वधुपिता आमदार प्रशांत बंब यांनी मुलीच्या लग्नात केलेल्या भन्नाट डान्सची देखील झाली. नातेवाईक आणि मुलीच्या आग्रहा खातर बंब यांनी डॉन चित्रपटातील गाण्यावर ठेका धरला. पण गाणे रंगात आले तसे बंब यांच्यातील छुपा कलाकार देखील जागा झाला.

उपस्थितांना तोंडात बोट घालायला लावले

छोरा गंगा किनारे वाला, या डॉन चित्रपटातील गाण्यावर बंब यांनी भन्नाट डान्स करत उपस्थितांना तोंडात बोट घालायला लावले. अगदी अमिताभ स्टाईलमध्ये बंब पाच ते दहा मिनिटे गाण्यावर नाचत होते. उपस्थितांकडून त्यांना प्रोत्साहन मिळाल्याने मग त्यांनी वेगवेगळ्या गाण्यावर ठेका धरत नाचण्याचा पुरेपूर आनंदही लुटला. ऐरवी विरोधकांवर तुटून पडणारे प्रशांत बंब मुलीच्या लग्नात मात्र सगळं काही विसरून बेभान होऊन नाचले. त्यांच्या या नृत्याविष्काराची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gangapur BJP MLA Prashant Bamb Dance Aurangabad News