तांदळाची गोणी अन् वजनाची नाही हमी ! शिधा वाटपातील धक्कादायक प्रकार

संदीप लांडगे
Sunday, 27 September 2020

  • शालेय पोषण आहार : ५० ऐवजी ४५ किलोच मिळतो तांदूळ. 
  • शिधा स्वरूपात धान्यवाटपातील घोळ. 

औरंगाबाद : कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरूच आहे. याच धर्तीवर सरकारने माध्यान्ह भोजन योजनेतील शालेय पोषण आहारही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात खिचडी शिजवून न देता विद्यार्थ्यांना शिधा स्वरूपात धान्यवाटप होते. वितरणासाठी शाळांना देण्यात येत असलेल्या ५० किलोची तांदळाची गोणी वजन फक्त ४५ ते ४६ किलो भरत आहे. परिणामी, मुलांना नियमानुसार तांदूळ देण्यासाठी कमी पडत असल्याच्या तक्रारी मुख्याध्यापकांकडून शालेय पोषण आहार अधीक्षकांकडे आल्या आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कोरडा शिधा दिला जात आहे. त्यानुसार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरीता ३.४ किलो आणि इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता ५.१ किलो या प्रमाणात शाळानिहाय तांदळांची मागणी मुख्याध्यापकांनी पुरवठादारांकडे केली आहे. पुरवठादारांकडून शाळांना पन्नास किलो तांदळाच्या गोण्या वितरित करण्यात येत आहेत. मात्र, प्रत्यक्षात या तांदळाच्या गोण्यामध्ये फक्त ४५ ते ४६ किलो तांदूळच मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तांदळाचे वाटप करताना शेवटी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तांदूळच मिळत नाही. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शिक्षण विभागाचे आदेश आहेत, की मुख्याध्यापकांनी तांदूळ मोजून घ्यावा; परंतु शाळांनी वजनकाटा कोठून आणावा? पुरवठादाराकडे वजनकाटा असताना तांदूळ मोजून देण्यात येत नाही. गोणीचे वजन कमी भरल्यास पॅकिंग आम्ही करत नाही, त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. असे पुरवठादारांकडून सांगण्यात येते. वजनाच्या तक्रारी होऊन पालकांकडून शाळांच्या मुख्याध्यापकांनाच दोषी धरण्यात येते. पुरवठादार नामानिराळा राहतो, अशी खंत काही मुख्याध्यापकांनी व्यक्त केली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

राष्ट्रवादी शिक्षक संघटनेची मागणी 
पहिली ते आठवीच्या जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत साधारणतः दहा क्विंटल (५० किलोच्या २० गोण्या) तांदूळ दिल्यास त्या शाळेला प्रत्येक गोणीतून पाच किलो तांदूळ कमी मिळतो. म्हणजे साधारणतः साठ किलो तांदूळ कमी मिळत आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष द्यावे, असी मागणी राष्ट्रवादी शिक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे. 

 

४५ ते ४६ किलो तांदूळ भरत असल्याबाबत शाळेतील मुख्याध्यापकांचे फोन आले होते; मात्र मुख्याध्यापकांनी वितरकांवर विश्‍वास ठेवू नये; तसेच वजन केल्यशिवाय शालेय पोषण आहाराचे तांदूळ घेऊ नयेत. याबाबत वितरकांना विचारणा करण्यात येईल. 
- भाऊसाहेब देशपांडे (अधीक्षक, शालेय पोषण आहार) 

(Edit- Pratap Awachar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Get less grain in school nutrition diet Aurangabad news