Corona Breaking : गंभीरच.. आधी कैदी पळाले आता घाटी रुग्णालयातून पॉझिटिव्ह रुग्णाचे पलायन !

मनोज साखरे
Tuesday, 9 June 2020

शहरातील गणेश नगर येथील ३८ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने घाटी रुग्णालयातून पलायन केले. हा गंभीर प्रकार मंगळवारी (ता. ९) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. हा रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत होता. याआधी दोन कैदी रुग्णही कोविड केअर सेंटरमधून पसार झाले आहेत. 

औरंगाबाद : कोविड पॉझिटिव्ह रुग्णांबाबत समज गैरसमज अनेकांत दिसून आले. याउलट विषाणूची बाधा झालेल्या रुग्णातही समज गैरसमज, भीती निर्माण झाली आहे. याचे ताजे उदहारण औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दिसून आले. शहरातील गणेश नगर येथील ३८ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने घाटी रुग्णालयातून पलायन केले. हा गंभीर प्रकार मंगळवारी (ता. ९) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. हा रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत होता. याआधी दोन कैदी रुग्णही कोविड केअर सेंटरमधून पसार झाले आहेत. 

औरंगाबादचा वाढतोय कोरोना मीटर, आज ७२ रुग्ण सापडले, ७८० बाधितांवर उपचारही आहेत सुरू   
गणेशनगर येथील कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आणि इतर दोन पॉझिटिव्ह रुग्णांना सोमवारी (ता. ८) घाटी रुग्णालयात भरती केले होते. त्यातील गणेशनगर येथील ३८ वर्षीय रुग्णाने प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक असतांनाही त्यांना चकमा देत पलायन केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या  रुग्णाविरोधात बेगमपुरा पोलिसांत तक्रार घाटी प्रशासनाकडून प्राप्त झाल्याची माहिती बेगमपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले.

औरंगाबादेत दोन कोरोनाबाधित कैदी पळाले, कोविड सेंटरमधून केला पोबारा  

दुसरी बाब अशी की महापालिकेच्या कोविड सेंटरमधून रविवारी (ता. सात ) रात्री दोन कोरोना बाधीत कैदी पळाले आहेत. त्यांचा अद्याप शोध लागला नाही. त्यानंतर घाटी रुग्णालयातून एका बाधीत रुग्णाने पलायन केले.  कोविड सेंटरमध्ये उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यातील एकावर छावणी परिसरात झालेल्या खुनाचा आरोप असून, तो २०१८ पासून, तर दुसरा आरोपी बनावट नोटा चलनात आणल्याच्या आरोपाखाली १ नोव्हेंबर २०१९ पासून हर्सूल कारागृहात आहे. दरम्यान, त्यांच्यासह २९ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे शनिवारपासून त्यांच्यावर किलेअर्क येथील महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. 

रिकामे हात अन् हवालदिल मन...मजुरांची अशीही व्यथा   

त्यांना दुसऱ्या मजल्यावरील १५ खोल्यात प्रत्येकी २ कैदी असे ठेवण्यात आले. या कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी कारागृहाचे दिवसरात्र एकूण १२ कॉनस्टेबल आणि दोन तुरुंग अधिकारी तैनात होते.  रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास दोन्ही कैदी बाथरुमच्या खिडकीचे गज वाकवून आणि चादर खिडकीला बांधून पसार झाले.  त्यांचा कोणताही माग पोलिसांना लागला नाही. गंभीर गुन्ह्यातील आणि कोरोना पॉझिटिव्ह कैदी पसार होत असल्याने संसर्गाचा धोकाही त्यांच्यामुळे वाढू शकतो. रुग्ण पसार होणार नाहीत यावर  प्रशासनाने ठोस उपाय करायला हवेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghati Hospital Positive patient escapes from ward