तंबाखूविरोधी दिन विशेष : महाविद्यालयीन तरुणींही निकोटिनच्या जाळ्यात

मधुकर कांबळे
रविवार, 31 मे 2020

देशातील २६ कोटी लोक भागवितात तंबाखूची तलफ 

औरंगाबाद  : तंबाखू आणि तंबाखूयुक्त पदार्थांच्या सेवनाच्या जाळ्यात अल्पवयातच तरुणाई ओढली जात आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे महाविद्यालयीन तरुणींचाही समावेश आहे. तंबाखूचे सेवन करण्यापेक्षा सिगारेट ओढण्याकडे तरुण आकृष्ट होत आहेत. यामुळे सिगारेटच्या व्यसनातूनच पुढे तंबाखूपेक्षा अधिक नशेच्या अमलाखाली तरुणाई जाण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

ग्लोबल  अॅडल्ट टोबॅकोच्या दुसऱ्या सर्वेक्षणानुसार देशातील २६ कोटी ७० लाख म्हणजे एकूण लोकसंख्येच्या २८.६ टक्के लोक येणकेन प्रकारे तंबाखूची तलफ भागवत आहेत. त्यापैकी २९.६ टक्के लोक तंबाखू किंवा तंबाखूयुक्त पदार्थ चघळतात किंवा खातात. १०.०७ टक्के लोक धूम्रपान करतात, तर काहीजण दोन्ही प्रकारची व्यसने करतात. देशाच्या एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास १९ टक्के पुरुष तर दोन टक्के महिला धूम्रपान करतात. तसेच २१.४ टक्के पुरुष व १२.८ टक्के महिला तंबाखू किंवा तंबाखूयुक्त पदार्थ खातात. शासकीय दंत महाविद्यालयातील डॉ. शिरीष खेडगीकर म्हणाले, की युवतीही नशेच्या आहारी जात आहेत. विशेषत: आय. टी. कंपन्यात काम करणाऱ्या युवतींचे प्रमाण अधिक आहे. 

सतत ऑनलाइन असाल तर सावधान! जडताहेत हे आजार...

औरंगाबादमध्येदेखील एका महाविद्यालयातील ज्या बाहेरच्या राज्यातून शिकण्यासाठी आलेल्या आहेत त्या मुली सिगारेट ओढतात. सार्वजनीक ठिकाणी धूम्रपानाला बंदी असल्याने हुक्का पिणाऱ्यांचेही प्रमाण बऱ्यापैकी आहे. याशिवाय ई-सिगारेट जिला ENDS (इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिव्हरी सिस्टीम) म्हणतात मात्र या बॅटरीवर चालणाऱ्या सिस्टीममुळे व्यसन करणाऱ्यांचा मृत्यूच होऊ शकतो. देशात २०१८ मध्ये एकूण मृत्यूपैकी साडेनऊ टक्के मृत्यू धूम्रपान केल्याने झाले. या व्यसनामुळे आजारी झालेल्यांवर कराव्या लागणाऱ्या उपचारांसाठी त्यावर्षी अंदाजे १३,५१७ कोटी रुपये खर्च झाले. हा खर्च आपल्या देशाला सध्याच्या परिस्थितीत अजिबात परवडणारा नाही. त्यामुळे तंबाखू नियंत्रणविषयक ‘कोटपा’ कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. 
 
Admission अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी अॅप..

कमी वयातच व्यसनाधीन 
 
केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या कायदे सल्लागारांनी तंबाखू सेवन आणि धूम्रपान करण्यासाठी सध्या असलेली १८ वर्षे वयाची परवानगी रद्द करून ती २१ वर्षे करण्याची सरकारकडे शिफारस केली आहे. काही दुरुस्त्यांसह हा कायदा मंजुरीसाठी संसदेकडे पाठवला जाणार आहे. ग्लोबल  अॅडल्ट टोबॅको सर्व्हेच्या पहिल्या आणि दुसऱ्या सर्वेक्षणानंतर तंबाखूच्या व्यसनाची चटक लागलेल्या युवकांच्या वयामध्ये सरासरी १८ वर्षे नऊ महिन्यांवरून १७ वर्षे नऊ महिन्यांपर्यंतची घसरण आढळून आल्याने सध्याची १८ वर्षांची तरतूद रद्द करून ती २१ वर्षे केली जाणार आहे. 
 
निकोटिनची नशा म्हणजे काय? 
डॉ. खेडगीकर म्हणाले, की तंबाखू तोंडात ठेवल्यावर किंवा ओढल्यावर तंबाखूतील निकोटिन व्यसन करणाऱ्याच्या रक्तप्रवाहात चटकन मिसळते. विडी, सिगारेट, हुक्का किंवा नस (तपकीर) ओढल्यावर लागलीच रक्तात निकोटिन मिसळते. अवघ्या पंधरा-वीस सेकंदांत शरीरात पसरते, मेंदूपर्यंत जाऊन नशा आल्याचा फील येतो; मात्र हे क्षणिक सुख असते. याचेच पुढे व्यसनात रूपांतर होते. तंबाखू सेवनाने तोंडाचा कॅन्सर होतो, रक्तातील पेशींचे स्वरूप बदलते; तसेच धूम्रपानामुळे पचनसंस्थाविषयक, हृदयविकार, फुप्फुसाचे विकार होतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girls addicted to tobacco Aurangabad News