राज्य योजनेतून घाटीला मिळणार दोन कोटींची यंत्रे

योगेश पायघन
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

अनेक यंत्रांची खरेदी प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी 25 कोटींहून अधिकचा निधी हाफकिनकडे पडून आहे. आर्थिक वर्ष सरत आले तरी राज्य योजनेचा निधी अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे निधी कधी मिळेल, मार्च अखेर तो हाफकिनला कधी वर्ग होईल का? वर्ग झाल्यावर प्रत्यक्ष यंत्र कधी मिळेल, यावर मात्र प्रश्‍नचिन्ह कायम आहे.

औरंगाबाद ः राज्य योजनेतून 2019-20 या वर्षातील मंजूर निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 21 लाख 49 हजारांची तर घाटी रुग्णालयाला एक कोटी 88 लाखांच्या यंत्रसामग्री खरेदीला 30 जानेवारीला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यामुळे घाटीला आता एकूण दोन कोटी नऊ लाख 63 हजार 874 रुपयांची अठरा प्रकारची यंत्र मिळणार आहेत.

वर्ष 2019-20 अंतर्गत राज्य योजनेतून मंजूर निधीतून वैद्यकीय शिक्षण व द्रव्ये विभागाच्या वतीने घाटी रुग्णालयातील दोन कोटी नऊ लाख यंत्रसामग्री खरेदीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. नुकत्याच काढण्यात आलेल्या अध्यादेशात दोन सी पॅप मशीन, व्हॅक्‍युम असिस्टेड वुन्ड क्‍लोजर सिस्टिम विद ऍक्‍सेसरीज, नॉन इन्व्हॅजिव्ह मॅकेनिक व्हेंटिलेटर बायपेप, रेटकॅम, ब्लड गॅस ऍण्ड इलेक्‍ट्रॉईड नेलाईझर विद स्टॅण्डर्ड ऍक्‍सेसरीज, हाय डेफिनेशन व्हिडिओ बॉन्कोस्कॉप, निओनेटल हायब्रीड व्हेंटिलेटर, क्‍यू स्वीच एनडी यॅग लेझर सिस्टिम, सेंट्रिफ्युज मशीन, स्लेज मायक्रोटोम, सबमरीन एलाईजा प्लेट वॉशर, एलाईजा प्लेट रीडर, डिजिटल फिजिओग्राफ, बायनोक्‍युलर मायक्रोस्कोप, कॅडेव्हर एम्बॅलमिंग इंजेक्‍टर, ईसीजी मशीन, कॉम्प्युटर असिस्टेड निमल सायम्युलेशन सॉफ्टवेअर या यंत्राचा समावेश आहे.

वाचा ः वीर्यदानानेही गर्भधारणा होत नाही... हा आहे पर्याय

खरेदीवर प्रश्‍नचिन्ह कायम

घाटीत अद्ययावत यंत्रसामग्री नसल्यामुळे रुग्णसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. घाटी प्रशासनाला तारेवरची कसरत करीत रुग्णसेवा द्यावी लागते. घाटी प्रशासनाकडून आतापर्यंत कोट्यवधी रुपयाची यंत्रसामग्रीबाबत प्रस्ताव शासनाकडे दिले आहेत. त्यापैकी अनेक यंत्रांची खरेदी प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी 25 कोटींहून अधिकचा निधी हाफकिनकडे पडून आहे. आर्थिक वर्ष सरत आले तरी राज्य योजनेचा निधी अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे निधी कधी मिळेल, मार्च अखेर तो हाफकिनला कधी वर्ग होईल का? वर्ग झाल्यावर प्रत्यक्ष यंत्र कधी मिळेल, यावर मात्र प्रश्‍नचिन्ह कायम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gmch Ghati Hospital Aurangabad News