अस्मानी संकटात सुलतानीचाही फटका!

सचिन चोबे
Thursday, 5 November 2020

महसूल, कृषी व पंचायत विभागाच्या पाहणी अहवालात सिल्लोडवर अन्याय 

सिल्लोड (औरंगाबाद) : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सातत्याने बसत असताना सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सिल्लोड तालुक्यात संततधार व अतिवृष्टीच्या पावसाने धूमाकूळ घातला होता. मात्र, शेतीमालाच्या प्रशासनाने केलेल्या संयुक्त पंचनाम्यात तालुक्याचे बाधीत क्षेत्र केवळ ३ हजार ८८५ हेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविलेल्या अहवालात कळविले असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

महसूल, कृषी व पंचायत समिती विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार काम करण्याच्या शैलीचा तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसणार असून, अतिवृष्टीमुळे फक्त ३ हजार ३८५ हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाल्याचे दाखविल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार तर होणार नाही ना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तालूक्यात कापूस व मका पीकांचा पेरा मोठ्या प्रमाणात होतो. यावर्षीच्या खरिप हंगामातदेखील तालुक्यातील लागवडयोग्य क्षेत्र असलेल्या ९८ हजार ४२९ हेक्टरपैकी ९७ हजार ६८४ हेक्टरवर पेरणी झाली. यामध्ये ४० हजार ८७० हेक्टरवर कपाशी तर ३९ हजार ३०१ हेक्टरवर मकाची लागवड झाली. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मका पीक आडवे झाले तर कपाशी पीकात पाणी साचल्याने कैऱ्या मोठ्या प्रमाणात सडल्या. तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ६५० मिलिमीटर असतांना यावर्षीच्या मोसमात १०३१ मीलिमिटर पाऊस पडला. अतिवृष्टीमुळे सुरुवातीला मूग, उडीद पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर त्यानंतर कापूस व मका पिकास फटका बसला.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बऱ्याच ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिकांना सड लागली. परंतु, कार्यालयात बसून किंवा घरी राहून महसूल, कृषी व पंचायत समिती विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाज करण्याच्या पद्धतीमुळे फक्त ३ हजार ३८५ हेक्टरवरील पीकांचे नुकसान दाखविण्यात आल्याने शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळालीच तर त्यातून मोठा शेतकरी वर्ग तालूक्यात वंचित रहाणार आहे. 

उर्वरित पिकांचे पंचनामे झाले की नाही? 
अतिवृष्टीमुळे मका पीकाच्या उत्पादनास फटका बसला असताना पथकाने केलेल्या संयुक्त पंचनाम्यात कपाशीचे ३ हजार १९७ हेक्टर व उडीद ९५ हेक्टर तर मूग ९३ हेक्टर एवढेच नुकसान दाखविण्यात आले आहे. यामुळे उर्वरित मका, मिरची, अद्रक पीकांचे पंचनामे करण्यात आले की नाही असादेखील प्रश्न निर्माण होत आहे. 
 

(संपादन-प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government work hit farmers Sillod taluka news