esakal | गुढीपाडवा ‘कोरोना’ने केला आडवा
sakal

बोलून बातमी शोधा

 Gudhipadwa In Coronavirus Curfew Aurangabad News

ढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने, घर आणि वाहन खरेदी शुभ मानली जाते. सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक मार्केट, वाहन बाजार या सर्व बाजारपेठेत या दिवशी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. यंदा मात्र या बाजारपेठेवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे.

गुढीपाडवा ‘कोरोना’ने केला आडवा

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा मराठी नवीन वर्ष म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो; मात्र यंदा पाडवा कोरोनाच्या सावटाखाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यातील सर्व बाजारपेठा बंद राहणार आहेत. या मुहूर्तावर शहर व जिल्ह्यात होणारी १०० कोटींची उलाढालही ठप्प राहणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने, घर आणि वाहन खरेदी शुभ मानली जाते. सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक मार्केट, वाहन बाजार या सर्व बाजारपेठेत या दिवशी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. यंदा मात्र या बाजारपेठेवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. राज्यात संचारबंदी असल्यामुळे सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यामुळे औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सराफ मार्केट 
गुढीपाडव्याला सोने खरेदीचा विशेष मान आहे. शहरात सोन्याची ४५० ते ५०० छोटी-मोठी दुकाने, शोरूम आहेत. तर ग्रामीण भागात चौदाशे ते पंधराशे छोटी-मोठी दुकाने आहेत. सोने-चांदी मार्केटमध्ये शहर व जिल्ह्यात जवळपास २० ते २५ कोटींची उलाढाल होते. यापूर्वी २०१७ मध्ये सराफा विक्रेत्यांनी ४२ दिवसांचा बंद ठेवला होता. त्यावेळी गुढीपाडव्याला सराफा विक्रेत्यांचा सर्व व्यवहार बंद होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा गुढीपाडव्याच्या दिवशी सराफा मार्केट बंद राहणार असल्याची माहिती सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दिली. 

वाहन मार्केटमधील ५० कोटींची उलाढाल ठप्प 
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दरवर्षी दुचाकी आणि चारचाकी घेणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे; मात्र गेल्या तीन महिन्यांपासून ऑटोमोबाईल क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. बीएस-६ ची वाहने येणार असल्याने बीएस-४ आणि दुचाकी व चारचाकी व इतर वाहनांचे उत्पादन जानेवारीपासून बंद आहे. यामुळे हे मार्केट ठप्प आहे. दरवर्षी गुढीपाडव्याला २५०० हून अधिक दुचाकीची विक्री होते. तर ४५० ते ५०० चारचाकी वाहने विक्री होतात. यंदा ७० ते ८० चारचाकी, तर १००० ते १२०० दुचाकींची विक्री होईल अशी अपेक्षा होती; मात्र कोरोनामुळे ही विक्री ही आता थांबली आहे, अशी माहिती विकास वाळवेकर यांनी दिली. 

हेही वाचा : हातावर शिक्का असलेला पाहुणा आला अन उडाला गोंधळ

रिअल इस्टेटमध्ये पुन्हा मंदी 
२०१६ मध्ये आलेल्या नोटबंदीनंतर रिअल इस्टेट अर्थात बांधकाम क्षेत्रामध्ये मोठी मंदी आली होती. गेल्या वर्षभरापासून या मंदीतून हे क्षेत्र बाहेर आले आहे; मात्र कोरोनामुळे जगभरात अर्थव्यवस्था कोलमडली आहे. याचा परिणामही भारतीय अर्थव्यवस्था औद्योगिक क्षेत्रावरही झाली आहे. यामुळे रिअल इस्टेटमध्ये पुन्हा मंदी येण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे. यंदा गुढीपाडव्याला एकही गृहप्रवेश होणार नसल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले आहे. 


सराफा बाजारातील उलाढाल एखाद्या आजारामुळे बंद राहण्याची ही पहिलीच वेळ राहणार आहे. मोठ्या आशेने यंदा सोन्याची विक्री होईल, असे वाटले होते; मात्र कोरोनामुळे सर्व आशेवर पाणी फिरले. 
- राजेंद्र मंडलिक, अध्यक्ष, सराफा असोसिएशन, औरंगाबाद 

इतिहासात पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्रातील उलाढाल बंद आहे. पहिले बीएस- ६ मुळे बंद होती. आता कोरोना व्हायरसमुळे ‘कॅड’ या संघटनेने सात दिवस कुठलाही व्यवहार करू नका, अशा सूचना डिलर्सना दिल्या आहेत. त्यामुळे आज गुढीपाडव्याला कुठल्याही वाहनांची खरेदी-विक्री होणार नाही. 
- विकास वाळवेकर, डिलर औरंगाबाद 
 

go to top