esakal | माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची भूमिका ठरणार महत्त्वाची, सर्वांचे लागले लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

jadhav harshvardhan

माजी आमदार हर्षवर्धन जाधव कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची भूमिका ठरणार महत्त्वाची, सर्वांचे लागले लक्ष

sakal_logo
By
संतोष शिंदे

पिशोर (जि.औरंगाबाद) : कोरोना कालावधीत लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणूक ता.१५ जानेवारी रोजी पार पडल्या. बहुचर्चित पिशोर (ता.कन्नड) ग्रामपंचायतीचा निकाल ता.१८ जानेवारी रोजी लागला. पंचरंगी लढतीत कोणत्याही एका पॅनलला बहुमत मिळालेले नाही. येथील सरपंचपदाची माळ सर्वसाधारण महिलेच्या गळ्यात पडणार आहे. यात उद्या सोमवारी (ता.आठ) होणाऱ्या सरपंच निवडीत माजी आमदार हर्षवर्धन जाधवांची भूमिका राहणार आहे.

लक्षवेधक लढतीने वेधले राज्याचे लक्ष
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजनाताई जाधव आणि आदित्यवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्री. दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे पॅनल समोरासमोर असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या ग्रामपंचायतीकडे वेधले गेले होते.


कोणत्याही पॅनलला बहुमत नाही, पेच फसला
या निवडणुकीत माजी सरपंच पुंडलिक डहाके यांच्या शिवशाही ग्राम विकास पॅनलचे सर्वाधिक सात उमेदवार निवडून आले आहेत. या व्यतिरिक्त हर्षवर्धन जाधव समर्थक कै.रायभानजी जाधव ग्राम विकास पॅनलचे चार, संजनाताई जाधव समर्थक ग्रामविकास पॅनलचे दोन, राजेंद्र मोकासे व माजी उपसरपंच नारायण जाधव यांच्या आदर्श परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे तीन व एक अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत. बहुमतासाठी आवश्यक नऊ उमेदवार मात्र कोणत्याही एका पॅनलकडे नसल्याने सत्ता स्थापनेचा पेच अडकेलेला आहे.

दोन पॅनलचे उमेदवार सहलीवर
अठरा जानेवारीला निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही एका पॅनलला बहुमत नसल्याचे स्पष्ट झाल्याने आकड्यांची जुळवाजुळव करण्यासाठी पॅनल प्रमुख एकमेकांशी संपर्क साधायला लागले. माजी आमदार हर्षवर्धन जाधव समर्थक स्व.रायभानजी जाधव पॅनलचे चार व पुंडलिक डहाके यांचे शिवशाही पॅनलचे सात उमेदवार एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात असे चित्र सध्या तरी समोर येत आहे. या मुळे या दोन्ही पॅनलचे सदस्य सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होण्याअगोदरच सहलीवर रवाना झालेले आहेत.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

वेगवेगळी गणिते, अफवांचा बाजार
बहुमताच्या नऊ या आकड्यासाठी ग्रामस्थ वेगवेगळी गणिते मांडत आहेत. शिवशाही विकास पॅनल व स्व. रायभान जाधव पॅनल यांचे एकत्र अकरा उमेदवार होतात.जर या दोन्ही पॅनलचे सत्ता स्थापन झाली तर पुंडलिक डहाके यांच्या स्नुषा सरलाबाई डहाके या सरपंच पदाच्या प्रबळ दावेदार आहेत. या व्यतिरिक्त आदर्श परिवर्तन पॅनल, संजनाताई समर्थक पॅनल व स्व. रायभान जाधव पॅनल यांच्या एकत्रित नऊ उमेदवार होतात. वृद्ध दांपत्याच्या मारहाण प्रकरणात जामिनावर बाहेर आलेले  श्री.जाधव कोणती भूमिका घेतात हे सत्ता स्थापनेच्या खेळात महत्वाचे ठरणार आहे.वरीलपैकी कोणते गणित जुळून येणार हे येत्या आठ फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे. तो पर्यंत मात्र अफवांचा बाजार जोरात चालू राहणार आहे.       

संपादन - गणेश पिटेकर