esakal | शहराला झोडपले...तासाभरात ४१ मिलिमीटर पाऊस, अनेक भाग पाण्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad City news

बीड बायपास परिसरातील नाले ओव्हरफ्लो झाल्याने हा भाग जलमय झाला. दिशा घरकुलमध्ये तर १५ घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. 

शहराला झोडपले...तासाभरात ४१ मिलिमीटर पाऊस, अनेक भाग पाण्यात

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : काहीशी उसंत घेतलेल्या पावसाने गुरुवारी (ता. २३) रात्री जोरदार हजेरी लावत अवघ्या तासाभरात शहराला अक्षरशः धुऊन काढले. सखल भागांतील रस्ते, चौकांत गुडघ्यापर्यंत पाणी जमा झाले. हे पाणी शेकडो घरांमध्ये शिरल्याने घाबरलेल्या नागरिकांनी अग्निशमन विभागाला फोन करून मदतीसाठी धावा केला. बीड बायपास परिसरातील नाले ओव्हरफ्लो झाल्याने हा भाग जलमय झाला. दिशा घरकुलमध्ये तर १५ घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. 

सायंकाळी सातच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. सुरवातीला रिमझिम असलेल्या पावसाचा जोर एवढा वाढला की, एक ते दीड तासातच शहर जलमय झाले. शहरातील सखल भागांमध्ये पाणीच पाणी झाले. रस्त्यांवर तीन ते चार फुटांपर्यंत पाणी होते. हे पाणी विविध वसाहतींमधील शेकडो घरांमध्ये शिरले आणि अग्निशमन दलाचे फोन खणखणू लागले. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंजूरपुरा, एसटी कॉलनी, जयभवानीनगरचा परिसर, चौंडेश्वर कॉलनी, पुंडलिकनगरचा परिसर या भागातून नागरिकांनी मदतीसाठी कॉल केले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

या भागातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. खिंवसरा पार्क येथील एका घराची संरक्षक भिंत पडली. पैठण गेट, गुलमंडी, औरंगपुरा, सिटी चौक, समर्थनगर, गारखेडा भागातील सूतगिरणी चौक, दशमेशनगर, भाजीवाली बाई पुतळा, पीरबाजार यासह अन्य परिसरात पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे अग्निशमन विभागाने तातडीने मदतीसाठी गाड्या पाठविल्या. दरम्यान, चिकलठाणा वेधशाळेत या पावसाची ४१.२ मिलिमीटर एवढी नोंद झाली. 

जयभवानीनगरात पुन्हा तारांबळ 
जयभवानीनगरात घरांमध्ये पाणी शिरण्याचा प्रकार नेहमी घडतो. गुरुवारी जोरदार पाऊस झाल्यानंतर अनेक घरांसह अंडरग्राउंडमध्ये असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अग्निशमन विभागाचे फोन मदतीसाठी खणखणत होते.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

बीड बायपास जलमय 
सातारा-देवळाई परिसरातील नाल्यांच्या अतिक्रमणांचा विषयदेखील वारंवार समोर येत आहे. नाले दाबल्यामुळे गुरुवारी पावसाचे पाणी तुंबले. त्यामुळे अनेक भागांतील रस्ते पाण्यात हरवले. दिशा घरकुलमध्ये १२ ते १५ घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. पाहता पाहता पाण्याची पातळी घरातील किचन ओट्यापर्यंत गेली. त्यामुळे घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य पाण्यात भिजून नुकसान झाले. बीड बायपास रस्त्याशेजारील छत्रपतीनगर भागात अनेक इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले होते. या भागातील रस्त्यांच्या चढ-उतारामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा येत होता. श्रीगणेशनगर भागाला तळ्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे या भागातील महिला, पुरुष, लहान मुले भीतीमुळे भेदरलेल्या अवस्थेत होती.