ऐतिहासिक दरवाजांच्या सुशोभीकरणाने पर्यटनाला मिळेल चालना 

गेट ऐतिहासिक.jpg
गेट ऐतिहासिक.jpg

औरंगाबाद : ऐतिहासिक बिबी-का-मकबरा, पाणचक्कीनंतर दरवाजांचे शहर ही औरंगाबाद शहराची ओळख. मात्र, देखभाल दुरुस्तीअभावी काही दरवाजे नामशेषही झाले. सध्या अस्तित्वात असलेल्यांपैकी नऊ दरवाजांचे सुशोभीकरण स्मार्ट सिटी योजनेतून केले जात आहे. एप्रिल २०२१ पर्यंत या दरवाजांना झळाळी मिळणार असून, पर्यटकांसाठी हे दरवाजे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. 


जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी दरवर्षी देशविदेशातून लाखो पर्यटक शहरात येतात. यातील काहीजण वेरूळ लेण्यांसह शहरातील बिबी-का मकबरा, पाणचक्की पाहून परतात. त्यांना ऐतिहासिक दरवाजांसह शहरातील इतर पर्यटनस्थळांपर्यंत कसे नेता येईल, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र अनेक ऐतिहासिक दरवाजांची दुरवस्था, पडझड झाल्याने आधी दरवाजांची दुरुस्ती करणे गरजेचे होते. त्यानुसार नऊ दरवाजांच्या सौंदर्यीकरणाची निविदा काढण्यात आली; पण महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून ही कामे स्मार्ट सिटी योजनेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निविदांनाही लॉकडाउनचा फटका बसला. अखेर दोन दिवसांपूर्वी कामांना सुरवात करण्यात आली. एप्रिल महिन्यांपर्यंत ही कामे पूर्ण होणार आहेत. दरवाजांवर वाढले गवत, झाडे-झुडपे काढणे, परिसरातील अतिक्रमणे हटविणे, पडझड झालेल्या भागाचे बांधकाम करणे, जुन्या पद्धतीचे रूप देणे, रंगरंगोटी, प्रकाशयोजना अशी कामे केली जाणार आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर शहरातील ऐतिहासिक दरवाजांसह इतर पर्यटनस्थळांच्या दर्शनासाठी विशेष शहर बस सुरू करण्याचे नियोजन केले आहे. 

 
असा आहे नियोजित खर्च 

बारापुल्ला गेट (७३ लाख ५० हजार), रोषणगेट (३१ लाख ४१ हजार), कटकटगेट (४९ लाख २२ हजार), पैठणगेट (२४ लाख ८५ हजार), नौबत गेट (१७ लाख १९ हजार), महेमूद गेट (५६ लाख ३१ हजार), जाफरगेट (१७ लाख), काळा दरवाजा (३५ लाख ५४ हजार), खिलजी दरवाजा (१५ लाख ४८ हजार) याप्रमाणे नऊ गेटच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी २० लाख ५४ हजार रुपये खर्च केले जाणार आहे. 
 

यापूर्वीची झालेली कामे 

महापालिकेच्या निधीतून रंगीन दरवाजा, रोशनगेट, हत्ती दरवाजा, पैठणगेट या दरवाजांच्या दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. 

५०० कोटींच्या निधीची मागणी 
शहरातील ऐतिहासिक वास्तू व पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या अनेक रस्त्यावर अतिक्रमणे आहेत. काही रस्ते अरुंद आहेत. अनेक वर्षांपासून डांबरीकरणाची कामे झालेली नाहीत. त्यामुळे ५०० कोटींचा निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. हा निधी मिळाल्यास चांगले रस्ते तयार होतील व पर्यटनाला चालना मिळेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com