थर्टी फर्स्ट हॉटेल,  ढाबे होणार हाऊसफुल्ल 

शेखलाल शेख
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

चिकन, मटनाची हॉटेल चालकांनी दिली आगाऊ ऑर्डर 

औरंगाबाद : थर्टी फर्स्ट म्हटला की, पार्ट्या आल्याच; मग या पार्ट्या हॉटेल, ढाबे काहीजण तर घरीच मित्रमंडळी जमवून साजरा करतात. विशेष म्हणजे या दिवशी तर दारूचा महापूरच असतो. हॉटेल, ढाब्यांवरील पार्टीत सोबत असतात चिकन, मटनाच्या विविध प्रकारच्या डिशेस. थर्टी फर्स्टच्या दिवशी चिकन, मटनाची प्रचंड मागणी असल्याने हॉटेल, ढाबेचालकांनी आत्तापासूनच तयारी केली असून, आगाऊ ऑर्डर देऊन ठेवल्या आहेत. शहरात थर्टी फर्स्टच्या दिवशी चिकन, मटन, माशांची टनाने विक्री होण्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला आहे. 

चिकनची सर्वाधिक चलती 

मटनाच्या तुलनेत चिकन स्वस्त आहे. तसेच त्याच्या विविध डिश या मटनाच्या तुलनेत स्वस्त असतात. त्यामुळे शहरातील सर्वच हॉटेल, ढाब्यांमध्ये तसेच सर्वसाधारण ग्राहकांकडून चिकनची सर्वाधिक मागणी राहण्याची शक्‍यता आहे. सध्या दिवसाला औरंगाबाद शहरात 20 टनांपेक्षा जास्त चिकनची विक्री होते. 31 डिसेंबरला हॉटेल, ढाबेचालकांकडून दुप्पट मागणी असल्याने हीच विक्री 30 टनांपेक्षा जास्त जाण्याची शक्‍यता आहे. सध्या ब्रॉयलर जिवंत कोंबडी 100 रुपयांना, तर चिकन 160 रुपये किलो आहे. ज्यांना गावरान चिकन हवे आहे ते 440 रुपये, तर डुप्लीकेट गावरान हे 240 रुपये किलो दराने विक्री होत असल्याची माहिती सेंट्रल नाका येथील चिकन विक्रेते बाबूभाई यांनी दिली. 

हेही वाचा - काय भयानक अनुभव आला या शिक्षिकेला वाचा...
मटनाची दुप्पट विक्री 

शहरात दररोज मटनाची विक्री 10 टनांपर्यंत होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मात्र थर्टी फर्स्टच्या दिवशी मटनाला दुप्पट मागणी राहण्याचा अंदाज आहे. शहरातील अनेक हॉटेल तसेच नागरिकांकडून मटनाला मोठी मागणी असते. कित्येक हॉटेल, ढाबेचालकांनी आत्तापासूनच ऑर्डर्स देऊन ठेवल्या आहेत. सध्या सेंट्रल नाका येथे मटनाला 480 रुपये प्रतिकिलो असा दर असला तरी शहरातील विविध भागांत मटनाच्या दरातसुद्धा काही प्रमाणात फरक दिसून येतो. थर्टी फर्स्टला ग्राहकांकडून मटनाला मोठी मागणी असते. 

हेही वाचा -  सहा महिन्याचं बाळ आईच्या कुशीत होतं.....पण काळही आला अन् वेळही आली...

माशांचेही खवय्ये 

सध्या थंडी असल्याने माशांनासुद्धा मोठी मागणी आहे. त्यामुळे हिवाळ्यात माशांच्या किमती गारठून टाकणाऱ्या आहेत. माशांच्या किमती 20 ते 30 रुपयांनी वाढलेल्या आहेत. सध्या माशांच्या किमती 120 ते जास्तीत जास्त 600 रुपये प्रतिकिलो अशा आहेत. थर्टी फर्स्टच्या दिवशी माशांची विक्री दुप्पट असते. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hotel, Will be Housefull in Aurangabad