बापरे... औरंगाबाद विभागात सर्वाधिक कॉपीप्रकार

संदीप लांडगे
Saturday, 4 April 2020

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत राज्यात 880 कॉपी बहाद्दरांवर कार्यवाही करण्यात आली. त्या औरंगाबाद विभागात सर्वाधिक कॉपी केसेस झाल्याचे निदर्शनास आले.

औरंगाबाद ः महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे यंदा घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत राज्यभरात ८८० कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक कॉपीबहाद्दर औरंगाबाद विभागामध्ये आढळून आले आहेत; तर कोकण विभागात एकाही विद्यार्थाचा समावेश नसल्याचे दिसून आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळातर्फे १८ फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागातर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती, पालकांच्या बैठकी घेऊन विद्यार्थी, पालकांचे समुपदेशन करण्यात आले होते; तसेच या परीक्षेत सामूहिक, वैयक्तिक कॉपी होऊ नये, प्रश्नपत्रिका फुटू नये यासाठी परीक्षा मंडळाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त केला होता; परंतु पेपरच्या पहिल्याच दिवशी या नियोजनाचा फज्जा उडाला होता. 

 

वाचा कसा -  दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीत हलगर्जीपणा  

कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण मंडळाकडून कडक नियम केले जात असले; तरी दरवर्षी कॉपी करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे.  यंदाच्या बारावीच्या परीक्षेत राज्यात ८८० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक कॉपीबहाद्दर औरंगाबाद विभागामध्ये ३३३, नागपूर-१४३, पुणे-१११, लातूर -१२७, अमरावती-७४, नाशिक- ४४, कोल्हापूर-३८, मुंबई-१० जणांवर कारवाई केली आहे. कोकण विभागात एकही विद्यार्थी कॉपी करताना आढळलेला नाही. 

वाचा...  विनाअनुदान शाळांना मिळणार अनुदान   

औरंगाबाद विभाग दरवर्षी तीनशेच्या पार 
औरंगाबाद विभागातील जालना, बीड, परभणी, औरंगाबाद व हिंगोली या पाच जिल्ह्यांत दरवर्षी कॉपीचे प्रमाण जास्त असते. मागील वर्षी २०१९ ला ३२० कॉपीबहाद्दरांवर विभागातर्फे कारवाई करण्यात आली होती. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातून एकूण एक लाख ७१ हजार ९५९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यामधून परीक्षेच्या काळात एकूण ३३३ कॉपीबहाद्दरांवर बोर्डाकडून कारवाई करण्यात आली आहे. कॉपीसाठी ओळख असलेल्या औरंगाबाद विभागात पास होण्यासाठी दरवर्षी मुंबई, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश या ठिकाणाहून विद्यार्थी परीक्षेला येत असल्याचे प्रकार परीक्षेदरम्यान निदर्शनास आले आहेत. 

आश्चर्य वाचा -  आम्ही अंभईचे, निघाले मुंबईचे... बारावीच्या परीक्षेतील प्रकार  

बारावीचे कॉपी प्रकार

औरंगाबाद 333
नागपूर 143
पुणे 111
मुंबई 10
कोल्हापूर 38
अमरावती 74
नाशिक 44
लातूर 127
कोकण 00

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HSC Exam: How many copy cases are in Aurangabad section