कोविड चाचणी केली तरच चित्रपटगृहांना परवानगी, औरंगाबाद महापालिकेचा निर्णय

माधव इतबारे
Tuesday, 10 November 2020

चित्रपटगृह सुरू करण्यापूर्वी त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी औरंगाबाद महापालिकेने बंधनकारक केली आहे.

औरंगाबाद : चित्रपटगृह सुरू करण्यापूर्वी त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी महापालिकेने बंधनकारक केली आहे. प्रत्येक चित्रपटगृह मालकाला पत्र देण्यात आले असून, कर्मचाऱ्यांच्या चाचण्याही सुरू झाल्या आहेत. काही चित्रपटगृह चालकांनी दिवाळीनंतर कर्मचारी परत आल्यावर चाचणी करून घेऊ, असे महापालिकेला कळविले असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे शासनाने मिशन बिगीन अगेन अंतर्गत जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

औरंगाबादमध्ये ३९ हजार नागरिक आजारी, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेतून माहिती आली समोर

त्यात चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु करण्यास काही अटी टाकून परवानगी दिली आहे. त्यानुसार शहरातील चित्रपटगृह व नाट्यगृह सुरु करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात विचारणा केली असता, श्रीमती पाडळकर यांनी सांगितले की, चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु होताना सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे पत्र देण्यात आले आहे. अदालत रोडवरील तापडीया मैदानावर या चाचण्या केल्या जात आहेत.

खिवंसरा सिनेफ्लेक्सच्या सह आंबा-आप्सरा चित्रपटगृहाच्या २८ कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली, सर्वांच्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले. उर्वरित चित्रपटगृहांच्या कर्मचाऱ्यांची चाचणी देखील केली जाणार आहे. काही चित्रपटगृहांचे कर्मचारी बाहेगावी गेलेले असल्यामुळे ते परत आल्यानंतर चाचणी केली जाईल, असे चित्रपटगृह चालकांनी महापालिकेला कळविले असल्याचे, डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

दुरुस्तीसाठी पीव्हीआर बंद
मुकुंदवाडी येथील पीव्हीआर सिनेमागृह देखभाल दुरुस्तीसाठी बंद असल्याचे महापालिकेला कळविण्यात आले आहे. चित्रपटगृहांच्या कर्मचाऱ्यांसोबतच आठवडी बाजारात कोरोना चाचणी करण्यासाठी महापालिकेचे पथक नियुक्त करण्यात आले असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If Covid Test Don Then Permission To Theatres, Aurangabad Municipal Corporation Decision