बेरोजगार तरूणांसाठी खासदारांचा जॉब अलर्टस

शेखलाल शेख
Thursday, 16 July 2020

‘औरंगाबादचा मतदार, नको बेरोजगार’ या संकल्पनेवर आधारित ही योजना शैक्षणिक पात्रतेनुसार आणि किमान कौशल्यानुसार संबंधित बेरोजगार युवक-युवतींना जास्तीत जास्त नौकरीची संधी प्राप्त करून देण्यासाठी आहे.

औरंगाबाद: खासदार इम्तियाज जलील यांनी मतदार संघातील सर्वांसाठी विविध कौशल्य, शैक्षणिक अर्हता पुर्ण केलेल्या तरुण-तरुणींसाठी जॉब अलर्ट ही योजना सुरु केली आहे. यामध्ये शासकीय व निमशासकीय तसेच खासगी नोकऱ्यांच्या संदर्भात संपूर्ण माहिती आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

‘औरंगाबादचा मतदार, नको बेरोजगार’ या संकल्पनेवर आधारित ही योजना शैक्षणिक पात्रतेनुसार आणि किमान कौशल्यानुसार संबंधित बेरोजगार युवक-युवतींना जास्तीत जास्त नौकरीची संधी प्राप्त करून देण्यासाठी आहे. औद्योगिक क्षेत्रातील वेगवेगळ्या उद्योग समूहांशी संपर्क करून जॉब फेअर आणि कॅम्पस इंटरव्यु सारख्या संकल्पना राबवून युवक-युवतींना जास्तीत जास्त रोजगार कसा प्राप्त होईल यासाठी जॉब अलर्टस् च्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

हेही वाचा- मुलासह दोघे बुडाले, पित्याला वाचविण्यात यश

तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती बचतगटांना उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच गृहउद्योग उभारणीसाठी तज्ञ मार्गदर्शकांचे प्रशिक्षण उपलब्ध करुन दिले जाईल. जेणेकरून सर्व बचतगटांना व महिलांना योग्य तो रोजगार उपलब्ध होईल. औरंगाबाद जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी नौकरी मिळावी म्हणून मुलाखत, व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य व विविध क्षेत्रातील प्रशिक्षण, सेमीनार हे तज्ञांकडून दिले जाणार आहे. 

इथे मिळेल अलर्ट 

जॉब अलर्ट योजनेशी जोडले जाण्यासाठी ९१७२१००११६ या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर जॉईन जॉब अलर्ट व आपले नाव टाईप करुन मॅसेज करावा. मॅसेज केल्यावर आपल्यास अर्जाची लिंक व्हॉटसअप क्रमांकावर उपलब्ध होईल. अर्जात योग्य माहिती भरुन तो सबमिट करावा. त्यानंतर आपल्याला नोकरी संदर्भातील माहिती आपल्या व्हाटसअ‍ॅप क्रमांक व ई मेल वर उपलब्ध होतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imtiyaz Jaleel Job Alert Aurangabad News