esakal | मुरूम चोरांचा सपाटा, ‘एमटीडीसी’लाच धपाटा! 
sakal

बोलून बातमी शोधा

photo

मोक्याच्या शासकीय जमिनीलाच केले लक्ष्य ः अधिकारी म्हणतात, माहीत नाही बुवा 

मुरूम चोरांचा सपाटा, ‘एमटीडीसी’लाच धपाटा! 

sakal_logo
By
अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : शहर व परिसरातील हर्सूल, नायगाव, सावंगी आणि परिसरात मुरूम चोरांचा सुळसुळाट झालेला आहे. लॉकडाउनच्या काळापासून ‘एमटीडीसी’च्या जमिनीवरील मुरूम चोरून नेण्याचा धडाका मुरूम माफियांनी सुरू केला आहे. विशेष म्हणजे स्थानिक अधिकाऱ्यांनाही याबद्दल माहितीही नाही, हे विशेष! 
शहर परिसरातील गौण खनिज चोरी करणाऱ्या टोळ्या तयार झाल्या आहेत. गायरान जमिनीवरील मुरूम चोरणाऱ्या या टोळ्यांनी हर्सूल, जटवाडा, सावंगी या भागांत अनेक दिवसांपासून परिसरातील डोंगर पोखरण्याबरोबरच खासगी व सरकारी जमिनीवरील मुरूम, माती चोरून नेण्याचा सपाटा सुरू केला आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

‘एमटीडीसी’ला केले लक्ष्य 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) जटवाडा रोड परिसरात शंभर ते दीडशे एकर जमीन आहे. हर्सूल तलावाच्या समोरच्या बाजूला विस्तीर्ण अशी मोक्याची ही जमीन आहे. मुरूम माफियांनी लॉकडाउनचा फायदा घेत गेल्या चार महिन्यांपासून या जमिनीवरील मुरूम चोरण्याचा धडाका लावला आहे. मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत ट्रॅक्टरने भरून मुरूम लांबवीत आहेत. विशेष म्हणजे या जमिनीवरील झाडांच्या खोडांचीही माती काढली जात असल्याने अनेक झाडांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पर्यावरणप्रेमींना धमक्या 

मुरूम चोरांना परिसरातील नागरिकांनी किंवा पर्यावरणप्रेमींनी रोखण्याचा प्रयत्न केलाच तर वाद करणे, धमक्या देणे असे प्रकार केले जातात. हा परिसर सुशोभित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, बोधिवृक्ष माझ्या दारी कृती अभियानातर्फे ‘एमटीडीसी’कडे पाठपुरावा केला होता; मात्र त्याचा उपयोग झाला नाही. पर्यावरणप्रेमी संस्थेला ही जमीन सुशोभीकरणासाठी दिली तर किमान भूखंड माफियांच्या तावडीतून ही जमीन वाचू शकणार आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

अधिकारी झोपेत 

‘एमटीडीसी’ची जमीन ओरबाडण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू असताना स्थानिक अधिकाऱ्यांना याची साधी माहितीही नाही. चोर जेसीबी, हायवा ट्रक, ट्रॅक्टर घेऊन येतात किंवा मजुरांच्या माध्यमाने खोदण्याचे काम करतात. परिसरातील भीमटेकडी, हनुमान टेकडी, गणेश टेकडी हा निर्जन भाग असल्याने आणि रहदारी नसल्याने बिनधास्तपणे हा प्रकार सुरू आहे. 

पोलिसांची मिलीभगत 

मोठ्या प्रमाणावर मुरूम चोरी सुरू असताना पोलिस आणि महसूल विभाग मूग गिळून आहे. काही महिन्यांपूर्वी सावंगी भागातील नियोजित कृषी कर्मचारी गृहनिर्माण संस्थेच्या जमिनीवरील मोठ्या प्रमाणात मुरूम चोरी झाली होती. त्यावेळी फुलंब्री पोलिस ठाण्यात आणि महसूल विभागाकडे तक्रारी देऊनही साधी कारवाईही झाली नाही. 


‘एमटीडीसी’च्या जागेवरून मुरूम चोरी होत असल्याची माहिती तुमच्याकडूनच मिळाली. स्थानिक अधिकाऱ्यांना तत्काळ पाहणी करण्यास सांगितले जाईल. त्याचप्रमाणे पोलिस ठाण्यात तक्रार करून हा प्रकार थांबविणे आणि संबंधिताच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. 
- विनय वावधने, कार्यकारी अभियंता, एमटीडीसी, मुंबई