Success Stories : झेडपी शाळेत शिकलेल्या तरुणाची भरारी, अमेरिकेत अधिकारी

बाळासाहेब लोणे 
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

  • अभियंता कल्याण घुले यांनी संधीचे केले सोने
  • न्यूयॉर्कच्या पोलिस दलात आय.टी. प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम

गंगापूर (जि. औरंगाबाद) - ग्रामीण भागातील तरुणांना मोठ्या शहरात शिक्षण घेणेही दुरापास्त असताना घोडेगाव (ता. गंगापूर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्याने अमेरिकेत भरारी घेतली. कल्याण आसाराम घुले असे या तरुणाचे नाव असून, अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात ते सरकारच्या पोलिस दलातील आयटी विभागात प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करतात. घोडेगावसारख्या लहान गावातून आलेल्या कल्याण घुले यांना अमेरिकेचे नागरिकत्वदेखील मिळाले आहे. 

निर्धारित वेळेच्या आत अप टू डेट काम करण्याच्या पद्धतीने अमेरिका सरकारने आयटी क्षेत्रातील मानाच्या तीन पुरस्काराने कल्याण घुले यांना सन्मानित केले आहे. अभियंता घुले यांचे वडील जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. कल्याण यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घोडेगाव व गंगापूर येथील जिल्हा परिषद शाळेत तर अकरावी, बारावीचे शिक्षण औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात झाले. निलंगा (जि. लातूर) येथील महाराष्ट्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून २००१ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स शाखेत त्यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळविली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

हैदराबाद येथे काही अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी वाळूज एमआयडीसीत एक्स्पर्ट सोल्युशन या कंपनीत नोकरी केली. यादरम्यान २००५ मध्ये अमेरिकेतील एका कंपनीला ई-मेलद्वारे बायोडाटा पाठविला. या कंपनीने कल्याण घुले यांच्याशी संपर्क साधून नोकरीची संधी दिली. सुरवातीला काही दिवसांसाठी कामाचा व्हिसा मिळाला. नंतर कंपनीमार्फत नागरिकत्वाची प्रक्रिया पूर्ण झाली. पंधरा वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक असलेले कल्याण घुले हे ५८ अभियंत्याच्या टीमचे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. या टीमच्या माध्यमातून अमेरिका सरकारसाठी सॉफ्टवेअर बनविणे व त्याचा मेंटनेन्स ठेवण्याचे काम त्यांच्याकडे आहे. त्यांची पत्नी शिल्पा याही अभियंता असून, याच टीममध्ये त्या काम करतात. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

ढोल पथक स्थापन 

अभियंता घुले यांनी महाराष्ट्रातील मराठी दोनशे लोकांचे संघटन करून ढोल पथक स्थापन केले आहे. यात विविध महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी ते मोठ्या उत्साहात साजरी करीत असतात. बालगंधर्व म्युझिक, पुणे येथून त्यांनी आवश्यक ती सामग्री अमरिकेत नेली आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाचे पत्रदेखील त्यांना पाठविले आहे. 

 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

 

प्रत्येक दोन वर्षांनी भारतात माझ्या गावात येत असतो. आई-वडील दोघांनाही सहा महिन्यांसाठी अमेरिकेत घेऊन गेलो होतो. भारतातील सर्वच महापुरुषांची जयती, पुण्यतिथी कार्यक्रम येथे घेतले जातात. 

- कल्याण घुले (अभियंता, अमेरिका) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalyan Asaram Ghule Success Stories