कोविड रुग्णांच्या जिवाशी खेळ, दीड तास ताटकळला बाधित रुग्ण! मृत्यू चटका लावणारा 

Wednesday, 20 May 2020

पाच कोटी निधी मिळाला, मनुष्यबळ असतानाही येथे केवळ मोजकेच रुग्ण उपचार घेत आहेत. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही भर मीटिंगमध्ये याबाबत आश्चर्य व्यक्त करून सर्व व्यवस्था असताना मोजकेच रुग्ण का, असा सवालही उपस्थित केला होता, अशी माहितीही सूत्रांनी दिली. 
 

औरंगाबाद ः कोविड पॉझिटिव्ह रुग्णाची अचानक प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात पाठविले; पण फॉर्मॅलिटीत हा रुग्ण सुमारे दीड तास रुग्णवाहिकेत होता. पुन्हा अडमिट करून घेण्याची ना-ना. यामुळे रुग्णांच्या जिवाचा खेळ होत असून, अशा दोन रुग्णांसोबत हा प्रकार घडला. 

यात सोमवारी (ता.१८) उपचारासाठी आलेल्या व आणखी एका रुग्णाचा समावेश होता. या दोन्ही गंभीर रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. 
घाटी रुग्णालयात केवळ तीव्र लक्षणे असणाऱ्या व गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना भरती केले जाते. 

याशिवाय रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९० च्या खाली व श्वासाची गती तीसच्या वर असलेल्या रुग्णांना घाटी रुग्णालयात भरती केले जाते; परंतु इतर कोविड सेंटर आणि जिल्हा रुग्णालयातील रुग्णाची प्रकृती अचानक बिघडू शकते. त्यांना ऐनवेळी २० मिनिटांचा प्रवास आणि नंतर फॉर्मॅलिटी करून उपचार करणे यात वेळ जातो. 

त्यामुळे ४५० खाटांची सुविधा असताना मध्यम लक्षणे असलेली व त्यासोबतच मधुमेह, उच्चरक्तदाब असे आजार असलेल्या रुग्णांना घाटीत भरती करायला हवे.

असे घडले त्या रात्री 

जिल्हा रुग्णालयात पत्नीसह उपचार घेणाऱ्या ज्येष्ठ रुग्णाची प्रकृती अचानक बिघडली. सायंकाळी सातनंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे डॉक्टरानी रुग्णाच्या पत्नीला सांगितले. मात्र, त्याही वयोवृद्ध असल्याने त्यांच्यासमोर आणीबाणीची स्थिती आली. 

जिल्हा रुग्णालयात एका जागरूक रुग्णाने नातेवाइकांना फोन लावूनही दिला. एका रुग्णवाहिकेतून नंतर प्रकृती बिघडलेल्या रुग्णाला रात्री अकराच्या सुमारास घाटी रुग्णालयात नेले; पण तत्पूर्वी या रुग्णाच्या भरती प्रक्रियेला विलंब झाला व त्यानंतर उपचारादरम्यान रुग्णाचा काही तासांतच मृत्यू झाला. असा यापूर्वी एक प्रकार घडला अशी माहिती सूत्रांनी दिली. 

दाखल...पुन्हा दाखल!

प्रशासनाने सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांसाठी महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये, मध्यम लक्षणे, ४५ वयापेक्षा जास्त आणि दहापेक्षा कमी वय असलेल्या रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचाराचे नियोजन केले. तर तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या, गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांवर घाटी रुग्णालयात उपचार केले जातील असे ठरविण्यात आले आहे. 

हेही वाचा - वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली   

पण बरेचसे रुग्ण अचानक गंभीर होत आहेत. अशा रुग्णांना घाटी रुग्णालयात भरती करताना पुन्हा प्रक्रिया करावी लागते. यात बराच वेळ जातो. रुग्णांचा पूर्वेतिहास जाणून घेण्यात वेळ जातो. प्रसंगी रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न होणे, रुग्णांना रुग्णवाहिकेतच बराच वेळ ताटकळत ठेवणे यामुळे रुग्णाच्या जिवाशी खेळल्यासारखेच आहे. 

मध्यम लक्षणे असलेल्या 
रुग्णांवरही व्हावेत घाटीत उपचार

रातोरात अचानक प्रकृती बिघडणाऱ्या इतर रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांना घाटीत वेळीच उपचार मिळाले तर त्यांच्या जिवाचा धोका कमी होऊन ते स्थिरस्थावर होतील. त्यामुळे कधीही प्रकृती बिघडेल असे आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवरही सुसज्ज घाटी रुग्णालयात उपचार व्हायला हवेत. विशेष म्हणजे तिथे मोजकेच रुग्ण उपचार घेत आहेत. ही आश्चर्याची बाब आहे. 

आरोग्यमंत्र्यांनीही व्यक्त केली होती नाराजी 

घाटीत सुमारे ४५० बेडची क्षमता आहे. ४८ व्हेंटिलेटर आहेत. आयसीयू, एमआयसीयू, डायलिसीस व आयसोलेशनसाठीही व्हेंटिलेटर्स वापरले जात आहेत. कोरोनाच्या लढ्यात मेडिसीन बिल्डिंगचे रूपांतर कोविड रुग्णालयात झाले.

 ब्लॉग - अस्वस्थ वर्तमान 

पाच कोटी निधी मिळाला, मनुष्यबळ असतानाही येथे केवळ मोजकेच रुग्ण उपचार घेत आहेत. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही भर मीटिंगमध्ये याबाबत आश्चर्य व्यक्त करून सर्व व्यवस्था असताना मोजकेच रुग्ण का, असा सवालही उपस्थित केला होता, अशी माहितीही सूत्रांनी दिली. 

शेवटच्या टप्प्यात असलेले रुग्ण जिल्हा रुग्णालयाने घाटीकडे पाठवायला नको. त्यांच्याकडे ऑक्सिजन व्हेंटिलेटर आणि इतर सुविधा आहेत. त्यांनी रुग्ण शिफ्टिंगचा निर्णय घेतला तेव्हा तो सिरियस नसेलही. मी खात्री केली आहे दीड तास नाही; परंतु अर्धा तास उशीर लागला असावा. ट्रॉली, स्ट्रेचर आणणे अशा फॉर्मलिटीज पूर्ण करताना वेळ लागतो; पण दीड तास वाढवून सांगितले जात आहे. घाटीतही ८६ रुग्ण आहेत. सर्व गंभीर असल्याने त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागत आहे.  -डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी    

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात..  

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kovid Playing With Patients Lives Patients In An Ambulance For An Hour And A Half Death clicker