esakal | महापालिकेची ही शाळा आहे खासगीच्या तोडीस तोड 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad amc news

सुसज्ज प्रयोगशाळा, वायफाय सुविधा, ई-लर्निंग, डिजिटल शिक्षण या उपक्रमशीलतेमुळे शहरातील महापालिकेची पहिली शाळा आहे, ज्या शाळेला ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे. 

महापालिकेची ही शाळा आहे खासगीच्या तोडीस तोड 

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : आपली मुले चांगल्या खासगी शाळांमध्ये शिकली पाहिजेत, असा प्रत्येक पालकाचा अट्टहास असतो; मात्र खासगी शाळांच्या तोडीस तोड शिक्षण देण्याचे काम महापालिकेची चिकलठाणा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शाळा करीत आहे. 
आठवीपासूनच विद्यार्थी इंग्रजी बोलायला शिकली आहेत. सुसज्ज प्रयोगशाळा, वायफाय सुविधा, ई-लर्निंग, डिजिटल शिक्षण या उपक्रमशीलतेमुळे शहरातील महापालिकेची पहिली शाळा आहे, ज्या शाळेला ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे. 

महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक कष्टकरी, मोलमजुरी करणारे. घर, परिसरात शैक्षणिक वातावरण जेमतेमच. अशा विद्यार्थ्यांना उद्याच्या स्पर्धेसाठी तयार केले जात आहे. ही प्राथमिक व माध्यमिक शाळा असून, सध्या साडेपाचशे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. लायन्स क्लब, महाराष्ट्र ग्रामीण बँक व इतर समाजसेवी संस्था, व्यक्तींच्या आर्थिक सहकार्यातून तीन ई-लर्निंग कक्ष निर्माण केले आहेत. कायमस्वरूपी वायफाय सुविधेच्या माध्यमातून वर्गनिहाय वेळापत्रकानुसार डिजिटल शिक्षण दिले जाते. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

‘अन् आरसा हसला’ 

मुख्याध्यापक देवेंद्र सोळंके यांनी सांगितले, की शाळेत अभ्यासक्रमाबाहेरील घटना, चित्र, गणितीय पद्धती, भाषा विषयातील विविध कवितांच्या स्वरबद्ध रचना, हस्तकला व इतर मनोरंजन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविले जात असल्यामुळे विद्यार्थी आनंदाने शाळेत येतात. यामुळे गळतीचे प्रमाण खूप कमी आहे. इथे प्रत्येक विद्यार्थी नीटनेटका असला पाहिजे, यासाठी शाळेत ‘अन् आरसा हसला’ उपक्रम राबविला जातो. व्हरांड्यात तीन मोठे आरसे लावण्यात आले आहेत.  शिवाय प्रत्येक वर्गखोलीतही एक आरसा आहे. प्रत्येक वर्गशिक्षकाकडे तेल, कंगवा, पावडर डबा, नेलकटर, सुई, दोरा, बटण हे साहित्य असलेली किट देण्यात आली आहे. विद्यार्थी गरजेनुसार वर्गशिक्षकांना मागणी करून स्वतः स्वच्छता व सुंदरता कायम ठेवतात. 

कृतीद्वारे पर्यावरण संवर्धन 

पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे शिक्षण कृतीद्वारे शिकविले जाते. ‘एक विद्यार्थी, एक वृक्ष’ उपक्रमामुळे शाळेचा परिसर निसर्गरम्य बनविण्यात आला आहे. पालकत्व घेतलेल्या झाडाजवळ त्या विद्यार्थ्याचा फोटो लावण्यात येतो. यामुळे विद्यार्थी झाडाची पूर्ण काळजी घेतात. यामुळेच इथे आंबा, चिंच, केळी, जांभुळ, गुलाब, जाई-जुई, मोगरा, जास्वंद आदी फळझाडे, फुलझाडे, शोभिवंत झाडे बहरली आहेत. चिमणी वाचवा उपक्रमात बांधण्यात आलेल्या घरट्यांमुळे पक्ष्यांचाही आता किलबिलाट ऐकायला येत आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
 
कोरोनाकाळातही व्हॉट्‌सॲप ग्रुपद्वारे शिक्षण 

मुख्याध्यापक श्री. सोळंके म्हणाले, की संगणक, टॅब मुलांना हाताळायला दिले जातात. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये असलेली विविध कौशल्ये, कला विकसित केल्या जातात. नवीन शैक्षणिक धोरणाचे स्वागत केले पाहिजे. कला, क्रीडा, संशोधन, तंत्रज्ञान यासंबंधित शिक्षण दिले जात असताना उपाययोजना कराव्या लागतील. कोरोना लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास दिला जातो.