अर्धा तास पळवुनही ती लागली नाही हाती !

मधुकर कांबळे  
मंगळवार, 14 जुलै 2020

सिडकोतील कामगार चौकाच्या पूर्वेकडील बाजूने सिडको एन-२ चा परिसर आहे. यापासूनच्या परिसरात सातारा देवळाई, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीचा परिसर काही अंतरावर आहे. लगतच्या शेतातून, जाळवणातून मोरांचे केंकारव ऐकायला येते.

औरंगाबाद : कोरोनामुळे शहरी भागात नीरव शांतता पसरल्याचे पाहून माणसांपासून दूर पळणारे पक्षी शहरात दाखल होत आहेत. याचा अनुभव सिडको एन-२ वासीयांना सोमवारी (ता.१३) आला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मानवी वस्तीत आलेल्या लांडोरला पकडण्यासाठी तब्बल अर्धा-एक तास प्रयत्न केल्यानंतरही लांडोर हाती लागली नाही. तीनशे मीटरपर्यंत भरारी घेत लांडोर दिसेनाशी झाली. 

सिडकोतील कामगार चौकाच्या पूर्वेकडील बाजूने सिडको एन-२ चा परिसर आहे. यापासूनच्या परिसरात सातारा देवळाई, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीचा परिसर काही अंतरावर आहे. लगतच्या शेतातून, जाळवणातून मोरांचे केंकारव ऐकायला येते. लॉकडाऊन आणि जनता कर्फ्युळे शहरात नीरव शांतता पसरली आहे, यामुळे रस्त्यांवर प्राणी निवांतपणे मुक्तसंचार करताना दिसत आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सोमवारी दुपारी येथील महालक्ष्मी चौकात लांडोर असल्याची माहिती राहुल इंगळे व परिसरातील नागरीकांनी वन विभागाला दिली. दुपारी दोनच्या सुमारास वनपाल शिवाजी चव्हाण तिथे दाखल झाले तेंव्हा लांडोर कडूलिंबाच्या झाडाच्या शेंड्यावर बसलेली दिसली. अधिवासात सोडण्यासाठी त्यांनी लांडोरला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र ती काही हाती लागली नाही आणि दिसेनासी झाली.

श्री. चव्हाण यांनी सांगीतले, उपवनसंरक्षक कार्यालयात फोन आल्यानंतर मी घटनास्थळी दाखल झालो, ती जखमी आहे का हे पाहण्यासाठी झाडाजवळच्या एका घराच्या गच्चीवर गेलो मात्र तीने साधारण २०० मीटरपर्यंत भरारी घेतली आणि दुसऱ्या इमारतीवर गेली. तिथेही गेलो असता दुसऱ्या झाडावर असे करत शेवटी तीने ३०० मीटरपर्यंत भरारी घेतली आणि दिसेनासी झाली. ती उडू शकत होती याचा अर्थ ती जखमी नव्हती. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

माणसांचा लागू शकतो लळा निसर्गप्रेमी रंजन देसाई म्हणाले, की सर्वत्र सामसुम असल्याने लगतच्या रानातून ती एवढे दूर आली असावी किंवा कोंबडीच्या अंड्यात मिसळून एखादे मोराचे अंडे आले असावे. या पक्षांना माणसांचाही लळा लागू शकतो. नायगाव मयूर अभयारण्यात मोर शेतकऱ्यांच्या जवळ जातात. कदाचित अशीच ती माणसांच्या सहवासातली लांडोर असू शकते. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Landor Wondering In City Aurangabad News