धास्तीने दाखविली शिस्त, अवघे औरंगाबाद घरांत

माधव इतबारे
शुक्रवार, 10 जुलै 2020

जालना रोडसह मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा, गल्ल्यांमध्ये दिवसभर शुकशुकाट होता. अत्यावश्‍यक सेवेची वाहने वगळता नागरिकांनी स्वयंशिस्तीने लॉकडाउनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली.

औरंगाबाद ः नऊ दिवसांचा लॉकडाउन जाहीर होताच जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात तोबा गर्दी करणारे शहरवासीय शुक्रवारी (ता. दहा) प्रत्यक्ष लॉकडाउन लागू होताच घरात बंदिस्त झाले. चोवीस तास वाहनांची वर्दळ राहणाऱ्या जालना रोडसह मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा, गल्ल्यांमध्ये दिवसभर शुकशुकाट होता. अत्यावश्‍यक सेवेची वाहने वगळता नागरिकांनी स्वयंशिस्तीने लॉकडाउनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. १८ जुलैपर्यंत नागरिकांनी अशीच शिस्त पाळल्यास कोरोनाची साखळी तुटण्याची आशा निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा सात हजारांच्या घरात गेला आहे. बळींचा आकडा तीनशेपार झाला आहे. त्यामुळे शहरात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. यापूर्वीच्या ८० दिवसांच्या लॉकडाउनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली नसल्यामुळेच शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा आरोप प्रशासनावर केला जात आहे. त्यामुळे यावेळी प्रशासनाने जय्यत तयारी केली. त्याचा चांगला परिणाम पहिल्या दिवशी दिसून आला. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
 
नागरिकांनाच भीती 
मुंबई, पुण्यापाठोपाठ कोरोनाचा कहर औरंगाबाद शहरात सर्वाधिक आहे. तीनशेपेक्षा अधिक जणांचे बळी कोरोनाने घेतले. त्यात दोन माजी नगरसेवकांचादेखील समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनीच कोरोनाची धास्ती घेतल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. सकाळच्या सत्रात घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी फिक्स पॉइंटवर अडविले. मात्र दुपारनंतर पोलिस खुर्च्या टाकून जागेवर बसून होते, तरीही वाहनांची गर्दी नगण्यच होती. 
 
महापालिकेचे मायक्रो प्लॅनिंग 
संचारबंदी यशस्वी होण्यासाठी महापालिकेने मायक्रो प्लॅनिंग केले आहे. दोनशे पथके तयार केली असून, त्यासाठी ४४० जणांची नेमणूक करण्यात आली आहे. चोवीस तास टप्प्या-टप्प्याने हे कर्मचारी संचारबंदीवर लक्ष ठेवतील व पोलिसांना मदत करतील असे नियोजन केलेले आहे. एका टीममध्ये दोन कर्मचारी असून, यातील एकजण व्हिडिओ रेकॉर्डिंग करेल तर दुसरा संचारबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे होते की नाही यावर लक्ष ठेवणार आहे. वीस लॉकडाउन सुपरवायझर, दहा लॉकडाउन सेक्टर ऑफिसर नियुक्त केले आहेत. त्याशिवाय दहा उपजिल्हाधिकारी लॉकडाउन निरीक्षक म्हणून काम करणार आहेत. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर 
संचारबंदीचे पालन काटेकोरपणे होते की नाही हे पाहण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय रस्त्यावर उतरले. शुक्रवारी सकाळपासूनच त्यांनी विविध भागांत फेरफटका मारून परिस्थितीची पाहणी केली. रात्रीदेखील हे अधिकारी संपूर्ण शहराचा फेरफटका मारणार असल्याचे सांगण्यात आले.

लाॅकडाऊनचे वैशिष्ट्य
शहरात प्रत्येक चौकाचौकांत लावले फिक्स पॉइंट 
सकाळी रस्त्यांवर दूध आणि वर्तमानपत्र विक्रेतेच 
सकाळी आठनंतर संपूर्ण शहरातील रस्ते निर्मनुष्य 
जुना मोंढा, जाधववाडी, गुलमंडी, सराफा, शहागंज बंद 
निराला बाजार, टिळकपथ, औरंगपुऱ्यात शुकशुकाट 
सिडको-हडको, रोशन गेट, शिवाजीनगर, जयभवानीनगर बंद 
चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल, सातारा-देवळाईत रस्ते निर्मनुष्य 
केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या निर्णयानुसार दुकाने बंद 
फक्त हॉस्पिटलशेजारी असलेली औषधी दुकाने होती सुरू 
शासकीय कंपन्या व सरकारी पेट्रोलपंपच होते सुरू 
अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या वाहनांनाच पेट्रोल व डिझेल 
बॅंकेत अंतर्गत कामकाज सुरू असले तरी व्यवहार मात्र ठप्प 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown in Aurangabad