Corona Virus खेकड्यांचा थांबलाय मुंबई, पुणे प्रवास! 

मधुकर कांबळे  
Monday, 1 June 2020

कवचधारी खेकड्यांमध्ये मानवी शरीराला खूप लाभकारी घटक असल्याने ते मोठ्या चवीने खाल्ले जातात. त्यातल्या त्यात गोड्या पाण्यातील काळ्या पाठीच्या खेकड्यांना मोठी मागणी असते.

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला तर खवय्यांची गोची झाली. गोड्या पाण्यातील चविष्ट खेकड्यांच्या शौकीनांच्या तोंडची तर चवच गेली. कारण लॉकडाऊनमुळे आठवडी बाजारच बंद असल्याने खेकडे पकडून तरी काय करणार म्हणून पकडणारे व विकणाऱ्यांनी भाजीपाला विकून उदरनिर्वाह सुरू केला आहे! 

नदी, ओढे आणि तलावाच्या काठावर तिरक्या चालीने चालणारा कवचधारी जीव अनेकदा पाहण्यात येतो. स्वत:च्या जीवाला जपण्यासाठी दोन्ही नांग्या उंचाऊन त्याच्याजवळ कोणी येऊ नये, असा इशाराच तो देत असतो. शरीरात रक्त नसलेला एकमेव जीव असलेल्या या कवचधारी खेकड्यांमध्ये मानवी शरीराला खूप लाभकारी घटक असल्याने ते मोठ्या चवीने खाल्ले जातात. त्यातल्या त्यात गोड्या पाण्यातील काळ्या पाठीच्या खेकड्यांना मोठी मागणी असते.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

उन्हाळ्यात खेकडे पाणी कमी झाल्याने तळाला जाऊन बसतात. या दिवसात त्यांना पकडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्या तुलनेत पावसाळा आणि हिवाळ्यात ते सोपे जाते. पाण्याच्या लाटा उसळतात तसे नदी, तलाव, ओढ्याच्या काठाला येतात आणि त्यांना पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात ते अलगद अडकतात. काही जण फेक जाळ्यातही खेकडे पकडतात. 

गोड्या पाण्यातील खेकड्यांना मुंबई, पुण्यात मागणी 

फिशरी सायन्स विषयात पीएच. डी. केलेले गोदावरी फिश सेंटरचे बशीर कुरेशी म्हणाले, की कावीळ, सांधेदुखीच्या आजारात, कॅल्शियमची कमी असणाऱ्यांना खेकडे खाणे फायदेशीर ठरते. यामध्ये व्हिटॅमिन डी आणि सी मुबलक असते. औरंगाबादेत गोदावरी नदीतील गोड्या पाण्यातील खेकड्यांना पुणे, मुंबई या भागात जास्त मागणी आहे. 

मुंबईला समुद्रातील लाल रंगाचे तर काळ्या रंगाचे ‘मड क्रॅप’ मिळतात परंतू ते खाऱ्या पाण्यातील असल्याने त्यात खारवटपणा असतो, त्यामुळे मराठवाडयातुन नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने तिथे स्थायिक झालेल्या लोकांना गोड्या पाण्यातील खेकडे आवडतात. लॉकडाऊनपूर्वी दररोज या दोन शहरांकडे पैठण आणि कायगाव येथुन जवळपास दीड हजार किलो खेकडे पाठवले जातात. परंतु, सध्या लॉकडाऊनमुळे या शहरांकडे खेकडे पाठवणे बंद आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

खेकडे बंद, भाजीपाला सुरू! 

खेकडे पकडून त्यांची विक्री करणारे शेखर कचरे म्हणाले, की पैठण, कायगाव, लोहगाव, शेवता, पिंपळवाडी या भागातील काही लोक गोदावरीत खेकडे पकडतात. मी छावणी आणि जाफरगेट, जुना मोंढा या आठवडी बाजारात खेकडे विकतो. शहरातील दोन आठवडी बाजारात मी खेकडे विकत होतो पण ते दोन्ही बंद झाल्याने खेकडे विकायचे कुठे? आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या भाजीपाला विकून उदरनिर्वाह करत आहे. 

विरू कुसाळे म्हणाले, की मी तलावात मत्स्यपालन करतो. परंतू दोन अडीच महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे लोक पैसा जपुन वापरत आहेत. खेकडे खाण्यापेक्षा भाजीपाला खालेला बरा असे म्हणत आहेत. त्यामुळे तलावात खेकडे असूनही त्यांची विक्री करता येत नाही. पण त्यांना खाद्य तर टाकत रहावेच लागते. आता मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर मासे आणि खेकड्यांची मागणी वाढेल. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown Crab No Demand Aurangabad News