लॉकडाउनने मारले पण मास्कने तारले 

mask
mask

औरंगाबाद : संसाराचा गाडा हाकण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरतीमुळेच महिला आत्मनिर्भर होतात. स्वराज्यनगरमधील महिलांनी हे सिद्ध करून दाखवले. घरीच मास्क तयार करून त्यांनी रोजगार मिळवला. मास्क तयार करण्यासाठी मशीन, कापड, बाजारात मास्क विकू देण्यासाठी पोलिस कम्युनिटीने त्यांना सहकार्य केले. एवढेच नव्हे, तर या झोपडीवजा घरात राहणाऱ्या महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद स्वत: भेट देत असतात.

संचारबंदीच्या काळात मध्यमवर्गीय, कमी मध्यमवर्गीय आणि गरिबांचे मोठे हाल झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचा रोजगार बंद झाल्याने घर चालवायचे कसे, असा प्रश्न बीड बायपास येथील स्वराज्यनगर परिसरात राहणाऱ्या कुटुंबांना पडला. रोजगार बंद झाला पण जगण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची तर सर्वांनाच गरज आहे. अशावेळी प्राजक्ता भवर यांना घरबसल्या काही करता येईल का, ही कल्पना सुचली. त्यांनी परिसरातील सर्व महिलांना जमवून ही कल्पना सांगितली. सर्वांनाच ती आवडलीही पण प्रश्न होता करायचे काय, मग संचारबंदीत सर्वांत जास्त मागणी आली ती मास्कला. यासाठी घरीच मास्क शिवून विकायचे ठरले. पण, खरेदी करणार कोण? संचारबंदीत कापड कुठून उपलब्ध होईल? बऱ्याच महिलांकडे शिलाई मशीनही नव्हती.

अशावेळी कुणीतरी पोलिस कम्युनिटी तुम्हाला सहकार्य करेन, असे सुचविले. संचारबंदीच्या काळात संपूर्ण शहरातील कोपऱ्या कोपऱ्यात अन्नवाटपाचा कम्युनिटीचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी स्वराज्यनगरमध्ये अशा महिला असल्याचे त्यांना कळल्यावर पुंडलिकनगरचे पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, धवलक्रांती संस्थेचे डॉ. किशोर उढाण यांनी मदतीचा हात पुढे केला.

महिलांना पोलिस आयुक्तांच्या सहकार्यातून मशीन्स मिळवून दिल्या. संचारबंदीत जालना, नागपूर येथील संस्थेच्या माध्यमातून डॉ. उढाण यांनी कापड आणि बाजारपेठ मिळवून दिली. एका मास्कसाठी २ रुपये याप्रमाणे १०० मास्कचे २०० रुपये या महिला घरबसल्या कमवत आहेत. त्यांचे हे काम पुढेही सुरू राहावे, त्यांना अर्थार्जन व्हावे, यासाठी पोलिस कम्युनिटीने बँक ऑफ बडोदाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांचे काम दाखविले. तसेच विविध कापड व्यावसायिकांना याच महिलांना काम देण्याचे सुचवले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com