धक्कादायक : लॉकडाउनमध्ये 60 पेक्षा जास्त शिक्षकांचा मृत्यू, पगार न मिळाल्याने 20 शिक्षकांची आत्महत्या

संदीप लांडगे
Sunday, 8 November 2020

लॉकडाउनमध्ये तब्बल ६० पेक्षा जास्त शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये २५ ते ३० शिक्षकांचा कोरोनामुळे, ११ शिक्षकांचा रक्तदाबाने तर खासगी विनाअनुदानित शाळेतील २० पेक्षा जास्त शिक्षकांनी पगाराअभावी आत्महत्या केली आहे.

औरंगाबाद : राज्यातील जिल्हा परिषद, विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. लॉकडाउनमध्ये तब्बल ६० पेक्षा जास्त शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये २५ ते ३० शिक्षकांचा कोरोनामुळे, ११ शिक्षकांचा रक्तदाबाने तर खासगी विनाअनुदानित शाळेतील २० पेक्षा जास्त शिक्षकांनी पगाराअभावी आत्महत्या केली आहे. आतापर्यंत राज्यात सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत्या, त्यानंतर शिक्षकांच्या आत्महत्‍येचा मृत्युदर असल्याचे कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्यप्रसिद्धी प्रमुख रवींद्र तम्मेवार यांनी सांगितले.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मार्चपासून देशात लॉकडाउन करण्यात आले. त्यानंतर खासगी अनुदानित व इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून शिक्षकांना वेतन देणे बंद करून नोकरीवरून काढले. त्यामुळे अनेक शिक्षकांनी पुन्हा गावाकडे जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ज्या शिक्षकांना मिळकतीचे साधन नाही, अशा शिक्षकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. परिणामी, वीसहून अधिक शिक्षकांनी आत्महत्या केली, तर नोकरी गेली म्हणून ११ शिक्षकांनी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने प्राण गमावले. कोरोनाच्या काळात जिल्हा परिषद व अनुदानित शाळेतील अनेक शिक्षकांना कोरोना वारियर्सची कामे देण्यात आली होती. कोरोना ड्युटी बजावत असताना २० पेक्षा जास्त शिक्षकांना कोरोना झाला अन् त्यातच त्यांना जीव गमवावा लागला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विनाअनुदानित शाळांचे प्रश्‍न गंभीर 

राज्यात विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांवर सहा लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. मागील वीस वर्षांपासूनचा कायम विनाअनुदानाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. तत्कालीन सरकारने एप्रिल २०१९ ला अनुदानाबाबत निर्णय घेतला; पण प्रत्यक्षात अनुदान दिले नाही. त्यानंतर सत्तेत आलेल्या आघाडी सरकाने २६ ऑगस्ट २०२० ला मंत्रिमंडळ बैठकीत ३४५.९३ कोटी रुपयांचा निधीला मान्यता दिली. मात्र, निधी वितरणाचे आदेश काढण्याऐवजी त्रुटी समिती तयार करून वेळकाढूपणा केला. आता नोव्हेंबरपासून अनुदान देणार असल्याचे सांगितले असले तरी, निर्णयात अस्पष्टता आहे. निर्णयाची अंमलबजावणी किती दिवसांत होईल? निधी मंजुरी कशी आहे? या प्रश्‍नांची उत्तरे गुलदस्‍त्यात आहेत. या अनुदानाच्या प्रतीक्षेत २७ शिक्षक, कर्मचाऱ्यांनी प्राण गमावले आहेत, काही शिक्षकांची नोंद ही शासन दरबारी झाली आहे, तर काहींची कुठेच नोंद घेण्यात आली नसल्याचे तम्मेवार यांनी सांगितले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown period More than 60 teachers killed