दिवसभर बसल्यावर वाटीत पडले आठ रुपये

शेखलाल शेख
Tuesday, 28 April 2020

गरीबांवर भीक मागण्याची वेळ, भिकाऱ्यांचे जगणे अवघड 

औरंगाबाद: ‘‘माझं नाव केसरंबाई. अंबड तालुक्याची हाय मी. पुर्वी झाडु पोछा करायचे. आता हात-पाय चालत नाही म्हणून इकडं शहरात आले. आज इथं तर उद्या तिथं जाऊन भीक मागायचं. रस्त्यावर कुणीच नाय. एखादा आला तर एक दोन रुपये देतोया. दिवसभर बसल्यावरी आठ रुपये मिळाले बघा. एक दिवस पंधरा रुपये मिळाले होते...’’ ही व्यथा आहे रस्त्यावर भीक मागणाऱ्या केसरबाईंची. 

गजानन महाराज मंदीर पासून हेडगेवर हॉस्पीटलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला फुटपाथवर सोमवारी (ता.२७) भर दुपारी त्या बसलेल्या होत्या. त्यांना सुरवातीला काही प्रश्‍न विचारल्यावर काहीच कळत नव्हतं. मग त्याच म्हणाल्या, ‘‘आरं बाबा ऐकु येत नाय.’’ मोठ्याने बोलल्यावर त्यांनी आपलं नावं केसरबाई सांगितले. अंबड येथून आल्याचे त्या सांगतात. मी ऐकटीच असल्याचे त्यांचे म्हणने. सोबत दोन पिशव्या आणि कुणीतरी पैसे देईल म्हणून समोर एक छोटीची वाटी त्यांनी ठेवली.

हेही वाचा - पुल टेस्टींग म्हणजे काय ? समजुन घ्या

मात्र ती वाटी लॉकडाऊनच्या काळात शक्यतो रिकामीच राहते. कधी कधी तर रुपयासुद्धा मिळत नाही. ‘‘पूर्वी मी झाडु-पोछा करत होते. त्यातून काही पैसे मिळायचे. रस्त्यावरुन कुणी येत कुणी जातं मात्र एखादाच एक-दोन रुपये देऊन जातो. ते मिळाले तर दहा पाच रुपये तेवढेच मिळतात पोटाला. आता गुडघे काम करत नाही. पायपाय चालत नाही. ऐकु पण येत नाही.’’ 

अन्नाची पाकिटे मिळणेही अवघड 

नियमित दिवसात रस्त्याच्या कडेला, धार्मिक स्थळांच्या बाजूला अनेक भिकारी दिसून येतात. काही सिंग्नलवर, उड्डाणपुलाच्या खाली भिक मागतात. मात्र लॉकडाऊन झाल्यापासून भिकाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही जण येतांना जातांना त्यांना अन्नाचे पाकीटे देतात. काहींना अन्नाचे पाकीटे मिळणे सुद्धा अवघड झाले आहे. 

शहरात अनेक कुटुंब अतिशय गरीब आहे त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. काही जण संस्थाकडून किट मिळेल का या आशेवर आहेत. मात्र या किटवर त्यांच्या कुटुंबाचे भागणे अवघड झालेले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lokdown Begar Problem In Aurangabad