MahaShivratri 2020 : विहिरीतील या मंदिरात होतो शिवपार्वती विवाह सोहळा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 February 2020

भावसिंगपुरा परिसरात असलेल्या चारशे वर्षे जुन्या सत्येश्वर-शिव-पार्वती मंदिरामध्ये प्रत्येक महाशिवरात्रीला महादेव आणि पार्वती यांचा विवाह सोहळा साजरा केला जातो. महादेव आणि पार्वतीचे एकाच ठिकाणी आणि तेही विहिरीत असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. 

औरंगाबाद : भावसिंगपुरा परिसरात असलेल्या चारशे वर्षे जुन्या सत्येश्वर-शिव-पार्वती मंदिरामध्ये प्रत्येक महाशिवरात्रीला महादेव आणि पार्वती यांचा विवाह सोहळा साजरा केला जातो. महादेव आणि पार्वतीचे एकाच ठिकाणी आणि तेही विहिरीत असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. 

सुमारे अडीचशे वर्षे जुनी ही परंपरा भावसिंगपुऱ्यातील नागरिक आजही मोठ्या श्रद्धेने पाळतात. महाशिवरात्रीच्या दिवशी या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. शहरासह पंचक्रोशीतून भाविक इथे हजेरी लावतात. जशी लग्नघटिका जवळ येते, तशी दोन्ही बाजूंच्या वऱ्हाडींची लगबग सुरू होते. वर महादेव व वधू पार्वती यांचा पुजारी मंडळी शृंगार करतात. मंगलाष्टकाचे सूर आळवले जातात आणि मध्यरात्री बाराच्या ठोक्‍याला सनई-चौघड्यांच्या निनादात वधू-वरांच्या अंगावर अक्षता पडतात.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील जुन्या भावसिंगपुरा परिसरात श्री सत्येश्वर शिवपार्वती मंदीर याच वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. शिव आणि पार्वती एकाच बारवेत जमिनीपासून सुमारे २० फूट खोल परस्परांच्या विरूद्ध दिशेला विराजमान आहेत. महाशिवरात्रीला येथे विवाहसाेहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी होतेच, शिवाय श्रावणातही भक्तांची गर्दी उसळते.

सरदार भावसिंग याने केली स्थापना

सुमारे साडे तीनशे वर्षे जुन्या या बारवेत सत्येश्वर शिवपार्वतीची स्थापना मुघलांचा सरदार भावसिंग याने केल्याचे सांगितले जाते. त्यांच्याच नावावरून या भागाला भावसिंगपुरा असे नाव देण्यात आलेले आहे. या भागात त्यांच्या सैनिकांची छावणी होती. या आवारातील एका भल्यामोठ्या बारवेत २०-२५ पायऱ्या उतरल्यावर दोन्हीकडच्या भिंतीतील देवळ्यांत शिव आणि पार्वती विराजमान आहेत.

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...

ही बारव सुमारे ५० फूट खोल आणि ३० फुट लांबरूंद आहे. त्यावर मोट लावण्याची योजना आहे. भिंतीवर हनुमानाची छोटी कोरीव मूर्ती आहे. या पवित्र ठिकाणी काशी, त्र्यंबकेश्वरप्रमाणे नारायण नागबळीची पूजा करण्याचीही प्रथा आहे, असे सांगितले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahashivratri 2020 Satyeshwar Shiv Parvati Temple Bhavsingpura Aurangabad Heritage News