औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी अडथळ्यांची शर्यत, सर्वोच्च न्यायालयात प्रकरण

Sakal
Sakal

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ चे आदेश दिले आहेत. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकेच्या निकालानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल पण पुढील अडथळा २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेचा आहे. सध्याची नगरसेवक संख्या २०११ च्या जनगणनेनुसार ठरविण्यात आली आहे. मात्र, २०२१ च्या जनगणनेनुसार शहराची व सोबत नगरसेवकांची संख्या वाढू शकते. त्यामुळे नव्याने रचना करण्याची वेळ प्रशासनावर येऊ शकते, अशी भिती व्यक्त केली जात आहे.


महापालिकेची एप्रिल २०२० मध्ये होणारी निवडणूक कोरोना संसर्गामुळे लांबणीवर पडली. दरम्यान महापालिकेच्या प्रभाग रचनेविषयी आक्षेप घेत माजी नगरसेवक समीर राजूरकर व इतरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने जैसे थेचे आदेश दिले आहेत. औरंगाबाद महापालिकेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याचा फटका राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकीला देखील बसण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या इतर महापालिकेच्या निवडणुका एकत्रित जाहीर केल्या होत्या.

मार्च-एप्रिलपर्यंत सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण संपेल, असा अंदाज बांधून प्रशासन कामाला लागले आहे. असे असले तरी पुढील अडथळा हा २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेचा ठरण्याची शक्यता आहे. जनगणनेच्या तोंडावर निवडणूका कशा होणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. महापालिकेतील नगरसेवकांची संख्या ११५ नगरसेवक एवढी असून, ती २०११ च्या जनगणनेनुसार ठरविण्यात आली आहे. नव्या जनगणनेत शहराची लोकसंख्या १५ लाखांपेक्षा जास्त नोंदविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ११८-११९ पर्यंत नगरसेवक संख्या जाऊ शकते असे तज्ञांचे म्हणणे आहे.

असे आहेत निकष
निवडणूक आयोगाच्या निकषानुसार १२ लाख लोकसंख्येला १२० नगरसेवकांची संख्या निश्‍चित केली आहे. त्यानंतर पुढील ४० हजार लोकसंख्येसाठी एक नगरसेवक अशी संख्या ठरविण्यात आली आहे. २०११ मध्ये औरंगाबादची लोकसंख्या ११ लाख ७५ हजार एवढी होती तर नगरसेवक संख्या ११३ एवढी होती. त्यानंतर सातारा देवळाई भागाचा समावेश झाल्याने नगरसेवकांची संख्या दोन ने वाढवून ११५ एवढी झाली.

Edited - Ganesh Pitekar


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com