esakal | मराठवाड्यातील कापूस गुजरातकडे, शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांना पसंती
sakal

बोलून बातमी शोधा

1cotton_67

मराठवाडा, विदर्भात सर्वाधिक कापसाचे उत्पादन होते. अतिवृष्टीमुळे या पिकाचे मोठे नुकसान झाले. हाती आलेल्या कापसाची प्रत काही प्रमाणात खराब आहे.

मराठवाड्यातील कापूस गुजरातकडे, शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांना पसंती

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : मराठवाडा, विदर्भात सर्वाधिक कापसाचे उत्पादन होते. अतिवृष्टीमुळे या पिकाचे मोठे नुकसान झाले. हाती आलेल्या कापसाची प्रत काही प्रमाणात खराब आहे. त्यातच चांगल्या प्रतीचा कापूस पदरात पडलेल्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी व्यापाऱ्यांना पसंती दिली आहे. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कापूस सध्या गुजरातमध्ये विक्रीला जात आहे. कमी उत्पादन, रोखीने मिळणारा पैसा ही त्यामागची कारणे आहेत. मराठवाड्यात सर्वत्र हिच स्थिती आहे.

कापूस हे चार पैसे मिळवून देणारे पीक आहे. यंदा अतिवृष्टीमुळे या पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतात टिकून राहिलेल्या कापसाच्या कशा तरी दोन-तीन वेचण्या झाल्या. काही शेतकऱ्यांच्या हाती तर एकच वेचणी आली. उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्याशिवाय प्रतीवरही परिणाम झाला आहे. दरवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांकडे यंदा कापूस कमी आहे. तो स्थानिक व्यापाऱ्यांना देणेच पसंत केले आहे. स्थानिक व्यापारी कापसाला प्रति क्विंटल ५ हजार ते ५ हजार २०० रुपये दर देत आहे.

शासनाने मध्यम धाग्याच्या कापसाला ५ हजार ५१५ तर लांब धाग्याच्या कापसाला ५ हजार ८२८ रुपये हमी दर दिला आहे. यापेक्षा व्यापाऱ्यांकडे सध्या काहीसा कमी दर मिळत असला तरी शेतकरी त्यांनाच प्राधान्य देताना दिसतात. अनेक शेतकरी आठवडे बाजारातही कापूस विक्री करीत आहेत. अनेक व्यापारी गावोगावी जाऊन थेट कापूस खरेदी करीत आहेत. त्यामुळे अन्य खर्चात होणारी बचत, लांब धाग्याच्या कापसाचे कमी प्रमाण, रोख पैसा यामुळे व्यापाऱ्यांना पसंती दिली जात असल्याचे चित्र आहे. व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी केल्यानंतर तो गुजरातमध्ये विक्रीसाठी नेला जात आहे. गुजरात मध्ये सध्या कापसाला ५ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल असा दर मिळत आहे. त्यामुळे दररोज अनेक ट्रक कापूस सध्या गुजरातकडे विक्रीसाठी जातोय.

घर खर्चासाठी हातभार...
ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांकडे पैसे नसतात. कोरोनामुळे अनेक जण गावाकडे असून त्यांना रोजगार नाही. त्यामुळे घराचा आर्थिक खर्च भागविण्यासाठी शेतकरी दहा, वीस, तीस किलो कापूस बाजारात व्यापाऱ्याला देत आहेत. त्यातून घर खर्च चालविण्यावर भर दिला जात आहे.
 

Edited - Ganesh Pitekar