औरंगाबादच्या वृद्धेवर अंत्यसंस्काराला कोणी नव्हते : आमदारांनीच दिला मुखाग्नी

मधुकर कांबळे
Sunday, 26 April 2020

अंबादास दानवे यांच्यामार्फत अंत्योदय योजनेअंतर्गत बेवारस मृतांचे त्या त्या समाजांच्या पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात येतात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत १७६ अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

औरंगाबाद : ज्यांचा कोणी वाली नाही अशा बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी पुढाकार घेतला आहे. सुपारी हनुमान मंदिराजवळ नेहमी दिसणाऱ्या सत्तरी पार केलेल्या लताबाई यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांचा मृतदेह घेण्यास कोणीही पुढे आले नाही. आमदार दानवे यांनी पुढाकार घेऊन बेगमपुरा स्मशानभूमीत बेवारस लताबाई यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.

अंबादास दानवे यांच्यामार्फत अंत्योदय योजनेअंतर्गत बेवारस मृतांचे त्या त्या समाजांच्या पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात येतात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत १७६ अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गुलमंडीतील सुपारी हनुमान मंदिराजवळ गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून लताबाई भीक मागून उपजीविका करायच्या. त्यांची मानसिक स्थिती बिघडल्याने त्यांच्याकडे घरच्यांनी दुर्लक्ष केल्याचे समजते.

मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरू ठेवले, पण हा पठ्ठ्या काय विकतोय पाहा

सत्तरीच्या पुढे वय झालेल्या लताबाई यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना शिवसेनेचे सोमनाथ बोंबले व इतर कार्यकर्त्यांनी घाटी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान लताबाईंचा मृत्यू झाला. नियमाप्रमाणे २४ तास नातेवाइकांची वाट पाहण्यात आली; मात्र कोणी नातेवाईक समोर न आल्याने मृतदेह बेवारस घोषित करण्यात आला. यानंतर शिवसैनिकांनी कागदपत्रांची पूर्तता करून मृतदेह ताब्यात घेतला.

ज्येष्ठांना मिळणार घरातच वैद्यकीय सल्ला

मृत लताबाई यांच्या पार्थिवाला कैलासनगर स्मशानभूमीत आमदार दानवे यांनी अग्नी दिला. यावेळी शिवसेनेचा सोमनाथ बोंबले, राजेंद्र दानवे, गणेश अंबिलवादे, पप्पू चोपडे, बबलू जैन, विजय पाटील, बेगमपुरा पोलिस स्टेशनचे पी. एन. काकडे अंत्यविधीस उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Ambadas Danve Came Forward For Funeral Aurangabad News