esakal | ऑक्सिजन प्लांटमध्ये निधीचा खोडा, प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पडून
sakal

बोलून बातमी शोधा

3oxygen_3

कोरोनाचा कहर सुरू असताना अचानक ऑक्सिजनची मागणी वाढली. ऑक्सिजन अभावी मृत्यू वाढण्याचा धोका निर्माण झाल्याने पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचे आवाहन महापालिकेला केले.

ऑक्सिजन प्लांटमध्ये निधीचा खोडा, प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पडून

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोनाचा कहर सुरू असताना अचानक ऑक्सिजनची मागणी वाढली. ऑक्सिजन अभावी मृत्यू वाढण्याचा धोका निर्माण झाल्याने पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचे आवाहन महापालिकेला केले. मात्र आता महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमधील ऑक्सिजन प्लांट निधी अभावी रखडला आहे. कोरोना उपया-योजनासाठी निधीचा महापालिकेचा प्रस्ताव दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाकडे पडून आहे.

CoronaUpdate : नव्याने ९६ जण कोरोनाग्रस्त, औरंगाबाद जिल्ह्यात सध्या ६८३ रुग्णांवर उपचार


कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे सप्टेंबर महिन्यात ऑक्सिजनची मागणी अचानक वाढली होती. अनेक गंभीर रुग्णांना आयसीयू बेड मिळत नसल्याचे चित्र शहरात होते. त्यामुळे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेत महापालिकेच्या मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरसाठी वीस किलो लीटरचा स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला. याठिकाणी असलेल्या तीनशे पैकी सध्या सव्वाशे खाटांना ऑक्सिजनची सुविधा आहे. प्लांट उभारल्यानंतर २५० खाटांना ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. त्यानुसार महापालिकेने जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळावा म्हणून एक कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला. दरम्यान निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे ऑक्सिजन प्लांटचे काम रखडले आहे.


लोकप्रतिनिधींनी केला होता विरोध
महापालिकेने कोरोना संदर्भात उपाय-योजना करण्यासाठी सुमारे ३७ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. त्‍यात ऑक्सिजन प्लांटच्या प्रस्तावाचा समावेश आहे. मात्र जिल्हा नियोजन समितीचा निधी महापालिकेला देण्यास लोकप्रतिनिधींनी विरोध केला. त्यामुळे ऑक्सिजन प्लांटसाठी निधी देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी हात आखडता घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान पालकमंत्र्यांनी मात्र औरंगाबाद शहरात मराठवाड्यासह इतर जिल्ह्यांचे रुग्ण उपचारासाठी येतात. निधी देताना भेदभाव करता येणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतरही महापालिकेला निधी मिळालेला नाही.

Edited - Ganesh Pitekar