खासगीपेक्षा सरकारीत गर्दी कशासाठी वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

शहरात एकूण ६१९ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील सुमारे साडेचारशे जण महापालिकेने सुरू केलेल्या कोविड केअर सेंटर, घाटी व मिनी घाटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्य शासनाने खासगी रुग्णालयांमध्ये बेड राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सध्या खासगी रुग्णालयांपेक्षा महापालिकेच्या कोविड केअर सेंटर व सरकारी रुग्णालयावरच विश्वास दाखवत रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. एकूण ६१९ पैकी सुमारे साडेचारशे जण महापालिकेने सुरू केलेल्या कोविड केअर सेंटर, घाटी व मिनी घाटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच महापालिकेने शहरात ठिकठिकाणी इमारती ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले आहेत. या ठिकाणी सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत, तर घाटी रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालयात गंभीर रुग्णांवर उपचार केले जात आहेत. वाढती रुग्णांची संख्या पाहता खासगी रुग्णालयांमध्ये शासनाने बेड राखीव ठेवले आहेत. असे असले तरी सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे महापालिकेच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सध्या सुमारे ६१९ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी किलेअर्क येथील महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये १०५, घाटी रुग्णालयात १३८, जिल्हा सामान्य रुग्णालयात १२४ रुग्ण उपचार घेत आहेत. एमआयटी मुलांच्या वसतिगृहात नऊजणांवर उपचार सुरू आहेत. पदमपुरा येथील अग्निशमन केंद्राच्या नवीन इमारतीमधील सेंटरमध्ये २८ जणांवर उपचार केले जात आहेत. एमजीएम स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये ४९ जणांवर व एमजीएम रुग्णालयात ६७ जणांवर उपचार केले जात आहेत. धूत हॉस्पिटलमध्ये २८ तसेच एशियन सिटी केअरमध्ये दोन, एमआयटी हॉस्पिटलमध्ये एक, हेडगेवार रुग्णालयात ३४ व कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये आठ, जे. जे. हॉस्पिटलमध्ये सहाजणांवर उपचार केले जात आहेत. 

वीस जणांवर घरीच उपचार 
एकदम सौम्य लक्षणे असलेल्यांवर शासनाच्या परवानगीने घरी राहून उपचार घेण्यास संमती देण्यात आली आहे. त्यानुसार वीस जणांना परवानगी देण्यात आली आहे. ६१९ जणांपैकी ३६ जणांना रविवारी (ता. सात) यशस्वी उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. त्यात एमजीएम स्पोर्ट कॉम्प्लेक्समधील तीन, एमआयटी मुलांच्या वसतिगृहातील एक, किलेअर्क येथील सेंटरमधील एक, पदमपुरा येथील सेंटरमधील एक, घाटी रुग्णालयातील दहा, जिल्हा सामान्य रुग्णालयातील १९ तर एमजीएम हॉस्पिटलमधील एका रुग्णाचा समावेश असल्याचे महापालिकेने कळविले आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

नव्या भागात कोरोनाचा फैलाव सुरूच 
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २,०६५ वर गेली आहे. यातील १२२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान रोज नवीन वसाहतीमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी उस्मानपुरा भागातील पीरबाजार येथे आठ रुग्ण आढळून आले. मजनू हिल भागातही एक बाधित रुग्ण आढळला. फाजलपुरा भागातील मोहनलालनगरात एक तर सिडको एन-९ भागातील संत ज्ञानेश्वरनगरात पाच रुग्ण आढळले. ज्युबलीपार्क भागात एक, सातारा परिसरात तीन रुग्ण आढळून आले. तीसगाव येथील पोलीस वसाहतीमध्ये एक रुग्ण आढळून आला. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व्हेक्षण, निर्जंतुकीकरण करून रस्ते सील करण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More crowds at government hospitals