व्हिडिओ कॉल वरून अंत्यदर्शन ...आईची होती शेवटची भेट  

मधुकर कांबळे
रविवार, 19 एप्रिल 2020

आई वडील कितीही थकलेले असले, अंथरणाला खिळलेले असले तरी त्यांचं नुसतं अस्तित्वचं घरातील वातावरण बदलून टाकत असतं.

औरंगाबाद - आई या शब्दातच सारं जग सामावलेलं आहे, त्या आईच्या शेवटच्याक्षणी मुलाला किंवा मुलीला जवळ नसणं किती वेदनादायी असतं ते अनुभवणाऱ्यांनाच कळत असतं. असाच प्रसंग येथील एका विवाहितेच्या जीवनात आला. कोरोनामुळे आईचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी जाता आलं नाही. शेवटी मोबाईलवरच्या व्हिडिओ कॉलद्वारे आईच्या निधनानंतर शेवटचं दर्शन घेण्याचा प्रसंग त्या माउलीवर ओढवला. 

आई वडील कितीही थकलेले असले, अंथरणाला खिळलेले असले तरी त्यांचं नुसतं अस्तित्वचं घरातील वातावरण बदलून टाकत असतं. औरंगाबादच्या नाथनगरात राहणाऱ्या उषा कांतीलाल गीते यांचं मूळ माहेर जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील पहूर. मात्र, त्यांचे कुटुंब मुंबईमध्ये खूप वर्षांपूर्वी स्थलांतरित झालेले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

उषाताईंच्या विवाहानंतर त्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. वडिलांचं छत्र हरवल्यानंतर त्यांची आई शांताबाई माधवराव माळी क्षीरसागर (वय ८४) उल्हासनगर येथे राहात होत्या. उषाताईंचे दोन भाऊ तिथे त्यांची काळजी घेत होते. आठ दिवसांपूर्वी शांताबाई माळी यांची तब्ब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी (ता.१७) उल्हासनगर येथे शांताबाई माळी यांचे निधन झाले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आईच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर उषाताई गीते यांना दु:ख अनावर झाले. मात्र, त्या जाऊ शकत नव्हत्या. त्यामुळे त्यांचा मुलगा सचिन याच्या मोबाईलवर व्हिडिओकॉलवरून त्यांना आईचे अखेरचे दर्शन घ्यावे लागले. त्या ‘आईशी शेवटची भेट होती, कोरोनामुळं जाता आलं नाही’ एवढंच त्या बोलल्या. लॉकडाऊनमुळे जिल्हाबंदी आहे. याच काळात जळगाव जिल्ह्यातील गावीही एका नातेवाइकाचं निधन झालं. मात्र, जाता आलं नाही. यामुळे आम्ही सर्वांनी व्हिडिओ कॉलद्वारे अखेरचं दर्शन घेतल्याचं त्यांनी सांगितलं. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mothers Funeral Attendence By Video Call Aurangabad News