फक्त... श्रेय घेण्यासाठी कोण करतयं मोर्चे, आंदोलने वाचा...

संदीप लांडगे
Wednesday, 8 January 2020

सरकारला धारेवर धरण्यासाठी शिक्षकांसंदर्भातील अनेक प्रश्‍न, विषय घेऊन दररोज शिक्षण उपसंचालक कार्यालय, जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चे, आंदोलन, उपोषणे

औरंगाबाद- जिल्ह्यातील शिक्षक पतसंस्थेची निवडणूक एप्रिलमध्ये होत आहे; तसेच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिक्षक संघटनामध्ये चढाओढ सुरु झाली आहे. 

शिक्षक वेतन, बिंदू नामावली अद्यावत करणे, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती, विस्थापित शिक्षकांची पदस्थापना, बीएलओ कामातून शिक्षकांना वगळणे, वैद्यकीय देयके निकाली काढणे, मृत डीसीपीएसधारकांच्या कुटुंबांना आर्थिक लाभ, डीसीपीएसधारकांना हिशेब पावत्या अचूक देणे, वस्तीशाळा शिक्षकांची सेवा मूळ दिनांकापासून ग्राह्य धरणे, जिल्हाअंतर्गत बदल्यांमध्ये अपेक्षित शिक्षकांची सुनावणी घेऊन कार्यवाही करणे, 

जुनी पेन्शन योजना, प्रतिविद्यार्थीप्रमाणे शिक्षकांना वेतन, शाळा एकत्रीकरणासाठी स्थापन झालेला अभ्यासगट, पात्र घोषित, अघोषित शाळा, शाळा, महाविद्यालयांचे अनुदान, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, महाविद्यालयांची परवानगी, शिक्षक भरती, पवित्र पोर्टलचा वाद, कायम विनाअनुदानित शाळेतील सेवा ग्राह्य, टीईटी अट शिथिल करावी, यासह इतर प्रश्न शिक्षक आणि संघटनांसमोर उभे आहेत. 

हेही वाचा - दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली...

मोर्चे, आंदोलने रोजच 
मार्चमध्ये शिक्षक पतसंस्थेची निवडणूक होणार आहे. त्यानंतर तीन महिन्यांनी पदवीधरच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी अनेक प्राध्यापक, शिक्षक संघटना कामाला लागल्या आहेत. त्यामुळे सरकारला धारेवर धरण्यासाठी शिक्षकांसंदर्भातील अनेक प्रश्‍न, विषय घेऊन दररोज शिक्षण उपसंचालक कार्यालय, जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चे, आंदोलन, उपोषणे केली जात आहेत. 

अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे

विधानसभा निवडणुकीनंतर अनेक शिक्षक संघटना क्रियाशील झाल्या आहेत. जिल्ह्यातील आपले वर्चस्व दाखविण्यासाठी प्रत्येक संघटना धडपडत आहे. तर काही शिक्षक संघटना आणि शिक्षक नेते उदयास येत आहेत. पतसंस्था व पदवीधरची निवडणूक संपली की संघटना आणि शिक्षक नेते गायब होतात. निवडणूक तोंडावर आल्यावर अचानक जिवंत झालेल्या शिक्षक संघटनांना शिक्षकांच्या प्रश्नांची, समस्यांची जाणीव होते. 

जाणून घ्या मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच! 

सध्या जिल्ह्यात शिक्षक संघटनांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे प्रत्येक संघटनेची मागणी तीच असते. फक्त संघटनेचे नाव बदलते. सर्वच शिक्षक संघटनांना सध्या शिक्षकांचा चांगलाच पुळका आलेला दिसत आहे. शिक्षक मतदारांना आकर्षित करण्यासाठी व आमचीच संघटना फक्त शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडत आसल्याचे दर्शविण्यासाठी शिक्षक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. 

हेही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम

जिल्ह्यात जुक्‍टा, मुप्टा, विज्युक्‍टा, शिक्षक परिषद, शिक्षक समिती, आदर्श शिक्षक समिती, शिक्षक महामंडळ, प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक सेना, खासगी शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना, प्रहार शिक्षक संघटना, मनसे शिक्षक सेना, प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती आदी संघटना आंदोलनाच्या मैदानात उतरत आहेत; परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद पतसंस्थेच्या निवडणुकीत शिक्षक मतदार कोणत्या शिक्षक संघटनेच्या पाठीशी उभे राहतात, कोणत्या संघटनेच्या उमेदवाराला साथ देतात, हे सांगणे सध्यातरी कठीण झाले आहे; मात्र प्रत्येक संघटनेकडून आपल्याकडेच पतसंस्था राहणार असल्याचे ठामपणे सांगितले जात आहे. 

अरे बाप रे -  औरंगाबादेत आठ जणांचे कुत्र्यांनी तोडले लचके 

पतसंस्था निवडणुकीसाठी 
इच्छुक संघटना 

शिक्षक पतसंस्थेची निवडणूक लढविण्यासाठी शिक्षक समितीसोबतच शिक्षक महासंघ, आदर्श शिक्षक, शिक्षक सेना व शिक्षक भारतीकडून सध्या जोरदार प्रयत्न केले जात आहेत. या संघटनांनी शिक्षक मतदारांची नोंदणी केली आहे. या शिक्षक संघटनांपैकी काहींचे उमेदवारसुद्धा जाहीर झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. 

पदवीधर मतदारसंघासाठी प्रयत्न 
येत्या जुलैत पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी सर्वच शिक्षक संघटनांकडून प्रयत्न केले जात आहेत. नव्याने नावनोंदणी झाल्याने यंदाची निवडणूक काट्याची होणार असे दिसत आहे; मात्र कोणती संघटना कोणाला पाठिंबा देणार हे मात्र येणारा काळच ठरविणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement to take credit for the work