महावितरणचे होणार विभाजन : सिल्लोड, बिडकीन, शेंद्रयाला नवीन कार्यालय!

अनिल जमधडे
Friday, 9 October 2020

तातडीने प्रस्ताव पाठवला मुंबईला मंत्र्यांच्या पाठपुराव्याचा परिणाम

औरंगाबाद : महावितरणने सिल्लोड, बिडकीन, शेंद्रयात नवीन विभागीय कार्यालय सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
महावितरण औरंगाबाद परिमंडलातील कन्नड विभागाचे विभाजन करून सिल्लोड येथे नवीन विभागीय कार्यालय सुरू करण्यासाठी प्रस्ताव आहे. त्याचप्रमाणे पैठण उपविभागीय कार्यालयाचे विभाजन करून बिडकीनला नवीन उपविभागीय कार्यालय आणि शेंद्रा एमआयडीत नवीन शाखा कार्यालय सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने शुक्रवारी (ता. नऊ) मुंबई कार्यालयाला पाठवला आहे. 

मुंबई येथे महावितरणच्या मुख्य कार्यालयात व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सिल्लोड, सोयगाव विधान सभा मतदारसंघातील विविध प्रश्न व वीज यंत्रणेतील सक्षमीकरणाबाबत बुधवारी (ता. सात) बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उर्जा मंत्री डॉ. नितीन राउत, महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, महावितरणचे प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते, प्रभारी संचालक (संचलन) सतीश चव्हाण, मुख्य अभियंता भुजंग खंदारे, अधिक्षक अभियंता संजय अकोडे, संजय सरग, रतन सोनुले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सध्या कन्नड येथे महावितरणचे विभागीय कार्यालय असून यात कन्नड, वैजापूर-१ व २, सिल्लोड, सोयगाव उपविभागीय कार्यालय आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भौगोलिक दृष्ट्या कन्नड विभाग मोठा असून ग्राहक संख्या देखील जास्त आहे. त्यामुळेच त्याच्या विभाजनाचा प्रस्ताव विचाराधिन होता. सिल्लोड व सोयगाव मधील वीज ग्राहकांना कन्नड येथे जाणेही गैरसोयीचे आहे. त्यामुळे वीज ग्राहकांच्या सोयीसाठी सिल्लोड येथे विभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठकीत केली होती. या बैठकीत उर्जामंत्री डॉ. नितीन राउत यांनी सिल्लोड येथे विभागीय कार्यालय सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. याची तातडीने दखल घेत महावितरण प्रादेशिक कार्यालयाकडून प्रस्ताव मुंबई येथे पाठविण्यात आला.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्याचप्रमाणे पैठण येथील उपविभागीय कार्यालय भोगोलिक दृष्ट्या मोठे असून ग्राहक संख्या देखील जास्त प्रमाणात असल्याने वीज ग्राहकांसाठी पैठण येथे जाणे गैरसोयीचे असल्याने रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी बिडकीनला नवीन उपविभाग सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पैठण उपविभागीय कार्यालयाचे विभाजन करून बिडकीन येथे नवीन उपविभागीय कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच शेंद्रा एमआयडीतील उघोजक संघटनेच्या प्रतिनिधींनी शेंद्रा एमआयडीतील उघोगांना महावितरणची सेवा तात्काळ उपलब्ध होण्यासाठी एमआयडीसीत नवीन शाखा कार्यालय सुरू करण्याची मागणी पालकमंत्री सुभाष देसाई याच्यांकडे केली होती. ही बाब सहव्यवस्थापकीय संचालक डॉ नरेश गिते यांनी उर्जामंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे शेंद्रा एमआयडीतही नवीन शाखा कार्यालय सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवला आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL Division Aurangabad news