महापालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

राज्यात इतर ठिकाणी निवडणुक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक देखील ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होऊ शकते, असा अंदाज राजकीय पक्षांतर्फे बांधला जात आहे. 

औरंगाबाद : कोरोनामुळे पुढे ढकललेल्या महापालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासाठी हालचाली सुरू केल्या असून, पोलिसांकडून आढावा घेतला जात आहे. दुसरीकडे कोल्हापूर व कल्याण-डोंबिवलीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. या दोन्ही ठिकाणची मुदत ऑक्टोबर-२०२० मध्ये संपणार आहे. 

महापालिकेची एप्रिल २०२० मध्ये निवडणूक होणार होती. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने वॉर्ड आरक्षण सोडत, वॉर्डरचना व मतदारयाद्या अंतिम केल्या आहेत. निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होणार तोच कोरोनाचा संसर्ग सुरू झाला व आरोग्याच्या शिफारसीनुसार निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या व महापालिकेवर सहा महिन्यांसाठी प्रशासक नियुक्त करण्यात आले. सध्या कोरोनाचा कहर कमी झालेला नसला तरी कायद्यानुसार निवडणुका घेणे बंधनकारक असल्याने राज्य निवडणूक आयोगाने चाचपणी सुरू केली आहे.

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  

औरंगाबाद महापालिकेसोबतच नवी मुंबईची निवडणूक असल्यामुळे निवडणूक घेण्यासंदर्भात नवी मुंबई पोलिसांसोबत आयोगाने चर्चादेखील केल्याचे सूत्रांनी सांगितले; तसेच ऑक्टोबरमध्ये कोल्हापूर व कल्याण-डोंबिवली महापालिकेची मुदत संपत आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी निवडणूक कार्यक्रम सुरू करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक देखील ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होऊ शकते, असा अंदाज राजकीय पक्षांतर्फे बांधले जात आहेत. 

नव्याने मतदार नोंदणी 
एप्रिलमध्ये महापालिकेची निवडणूक गृहीत धरून जानेवारी २०२० ची मतदारयादी गृहीत धरण्यात आली होती; मात्र निवडणुका सहा महिने लांबणीवर पडल्यामुळे आता नव्याने मतदार नोंदणीसाठी संधी देणे गरजेचे आहे. त्यामुळे तशा सूचना आयोगाकडून येऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. 

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना

महापालिका निवडणुकीसाठी यापूर्वीच तयारी पूर्ण झालेली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे निवडणूक लांबणीवर पडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे नव्याने कुठलेही आदेश महापालिकेला प्राप्त झालेले नाहीत. 
सुमंत मोरे, उपायुक्त, महापालिका. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal elections in November