आणि श्‍वानाला मिळणार तीस रुपये...वाचा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 January 2020

श्‍वानांची गणना करणाऱ्या देशात दोनच संस्था आहेत. त्यात ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल गुजरात आणि मिशन रेबिज गोवा या दोन्ही संस्थांचा समावेश आहे. त्यामुळे शहरात श्‍वानांची गणना करण्यासाठी या संस्थांना पत्र दिले जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

औरंगाबाद- शहरात मोकाट श्‍वानांचा धुमाकूळ सुरूच असून, एका अडीच ते तीन वर्षांच्या बालकावर श्‍वानांनी हल्ला केल्याचा प्रकार रविवारी (ता. 12) घडला होता. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी (ता. 14) आढावा बैठक घेतली असता, आतापर्यंत शहरातील कुत्र्यांची गणनाच झाली नसल्याचे समोर आले. त्यामुळे श्‍वानांची गणना करणे, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी संस्थांची निवड करण्याचा निर्णय घेतल्याचे महापौरांनी सांगितले. गोवा व गुजरात येथेच श्‍वानांच्या गणना करणाऱ्या संस्था असून, त्यांना पाचारण केले जाणार आहे. 

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

शहरात काही वर्षांपासून मोकाट श्‍वानांचा धुमाकूळ सुरू आहे. मुख्य रस्ते, चौक, ज्या भागात मांस विक्रीची दुकाने आहेत, अशा ठिकाणी श्‍वानांच्या टोळ्या फिरत आहेत. अनेक ठिकाणी श्‍वान लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले करीत आहेत. यात काहींचा बळीदेखील गेला असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. दरम्यान, रविवारी पडेगाव येथे मोकाट श्‍वानांनी चिमुकल्यावर हल्ला केला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला.

या प्रकरणाची दखल घेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी बैठक घेतली. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे डॉ. बी. एस. नाईकवाडे, होप संस्थेचे प्रवीण ओव्हळ, संजय नंदन यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी कुत्र्यांना दयामरण देण्यास अडचण येत आहे. शस्त्रक्रिया केल्यानंतर अनेक भागांत श्‍वानांना नाकारले जाते. त्यामुळे अडचणी येत असल्याचे होप संस्थेतर्फे सांगण्यात आले. त्यामुळे यासंदर्भात आपला या संस्थेवर जनजागृती करण्यासाठी निर्णय घेण्यात आला.

होप संस्थेकडून रोज 10 ते 15 श्‍वानांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली जात असून, महापालिकेकडून 15 ते 20 शस्त्रक्रिया केल्या जातात. रोजच्या शस्त्रक्रियांची संख्या पाहता संस्थेकडून उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्‍यता कमीच असल्याचे महापौरांनी पत्रकारांसोबत बोलताना नमूद केले. 
 
वर्षभरात घेतला फक्त 32 जणांनी परवाना 
शहरात हजारो जणांच्या घरात श्‍वान असले तरी गेल्या वर्षभरात परवाने फक्त 32 जणांनी घेतले आहेत. श्‍वान पाळण्यासाठी महापालिकेकडून परवाना घेऊन त्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे श्‍वानमालक दुर्लक्ष करीत आहेत. यापूर्वी 2200 जणांनी परवाना घेतला होता. मात्र त्यांनीदेखील परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही, असे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. 
 
गणनेसाठी फक्त दोन संस्था 
श्‍वानांची गणना करणाऱ्या देशात दोनच संस्था आहेत. त्यात ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल गुजरात आणि मिशन रेबिज गोवा या दोन्ही संस्थांचा समावेश आहे. त्यामुळे शहरात श्‍वानांची गणना करण्यासाठी या संस्थांना पत्र दिले जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. या संस्था एका श्‍वानाच्या सर्व्हेसाठी ३० रुपये  घेतात. 

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipality will Calculate Number of Dogs